Jammu & Kashmir: मोदी-शहांच्या 'मिशन काश्मीर'चा भाजपाला 'मिशन महाराष्ट्र'साठी महाफायदा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 02:49 AM2019-08-06T02:49:34+5:302019-08-06T08:51:55+5:30
निर्णयाचा सगळ्यात मोठा लाभ महाराष्ट्राला होण्याची शक्यता
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : संसदेत घटनेतील कलम ३७० काढून टाकण्याची घोषणा करून भाजपने येऊ घातलेल्या चार विधानसभा निवडणुकांसाठीही आपला पाया बळकट करून घेतला आहे. या निर्णयाचा सगळ्यात मोठा लाभ महाराष्ट्राला होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात भाजपचा मित्रपक्ष शिवसेनाही मुख्यमंत्री पदावर आपला हक्क सांगत आहे. कलम ३७० काढून टाकण्यासोबत भाजपने हे राजकीय संकेत द्यायचा प्रयत्न केला आहे की, राष्ट्रीय एकतेबद्दल आम्ही कोणतीही तडजोड करीत नाही. भाजपला आशा आहे की, या उपायामुळे देशात आपली स्थिती भक्कम होईल आणि महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा, दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्याला खात्रीने यश मिळेल.
कलम ३७० चा कोणता राजकीय प्रभाव पडू शकतो याचा अंदाज बहुधा शिवसेनेला तत्काळ आला. याच कारणामुळे शिवसेनेच्या नेत्यांनीच नव्हे तर त्याच्या वेगवेगळ्या कार्यालयांनीही मिठाई वाटून हा आनंद व्यक्त केला. भाजप आणि शिवसेना हे दोघेही हिंदू मतदारांना नजरेसमोर ठेवून आपली व्यूहरचना करतात. परंतु, कलम ३७० काढून टाकल्याची घोषणा भाजपने करून स्वत:ला बळकट करून घेतले. शिवसेनेच्या एका खासदाराने याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना या निर्णयाचा लाभ भाजपला मिळेल हे मान्य केले.