देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्र महत्त्वाचे, राज्याला गतिशील ठेवा; पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री फडणवीसांना कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 10:16 IST2024-12-13T10:15:46+5:302024-12-13T10:16:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत ...

Maharashtra is important for the country's economy, keep the state dynamic; PM Modi's advice to CM Fadnavis | देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्र महत्त्वाचे, राज्याला गतिशील ठेवा; पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री फडणवीसांना कानमंत्र

देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्र महत्त्वाचे, राज्याला गतिशील ठेवा; पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री फडणवीसांना कानमंत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत मोदींनी महाराष्ट्राच्या विकासाबाबत फडणवीसांना कानमंत्र दिला. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्र महत्त्वाचे राज्य असल्याचे मोदींनी सांगितल्याचे  फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पहिल्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांची भेट घ्यायची असते. त्याप्रमाणे मी या भेटी घेतल्या. सकाळी पंतप्रधान मोदींसोबत दीर्घ भेट झाली. या भेटीत महाराष्ट्राबाबत काही चर्चा आमच्यात झाल्या. महाराष्ट्राला गतीशील ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी ते पूर्ण सहकार्य महाराष्ट्राला द्यायला तयार आहेत असे पंतप्रधानांनी सांगितल्याची माहिती फडणवीसांनी दिली.

सात नेते, पाच मूर्ती ! 
nदेवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतर बुधवार आणि गुरुवारी पहिलाच दिल्ली दौरा हाेता. एकूण सात नेत्यांच्या त्यांनी भेटी  घेतल्या. त्यांनी नेत्यांना पाच निरनिराळ्या मूर्ती देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले.
nराष्ट्रपती व उपराष्ट्रपतींना 
विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती, पंतप्रधान नरेंद्र मोदींना छत्रपती शिवरायांची मूर्ती, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सावरकरांची मूर्ती, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना 
गाय-वासरुची मूर्ती, केंद्रीय मंत्री 
राजनाथसिंग आणि नितीन गडकरींना सिद्धिविनायकाची मूर्ती भेट दिली.

आमची दोन दिवसांत भेट नाही
मंत्रिमंडळ विस्ताराचा कुठलाही तिढा नाही. अजित पवार त्यांच्या कामाने आणि मी माझ्या कामाने दिल्लीत आलोय. शिंदेंचे दिल्लीत काही काम नसल्याने ते आले नाहीत. कालपासून आजपर्यंत माझी आणि अजित पवारांची दिल्लीत भेट झाली नाही. मी माझ्या पक्षातील नेत्यांच्या भेटी घ्यायला आलो आहे, असे फडणवीस म्हणाले.

वरिष्ठ ठरवतील त्यांना मंत्रिपदे
त्यांच्या पक्षाचे मंत्री कोण असतील ते एकनाथ शिंदे आणि अजित पवार ठरवतील. आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील त्याचा निर्णय भाजप संसदीय समिती ठरविते. मंत्रि‍पदाचे सक्षम उमेदवार कोण असतील, ते वरिष्ठ ठरवतील आणि आम्हाला सांगतील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

...म्हणून महाराजांची मूर्ती भेट दिली : २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात रायगडावर येऊन छत्रपती शिवरायांना नमन करून केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड श्रद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर ते चालण्याचा प्रयत्न करतात म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांना भेट म्हणून दिली, असे फडणवीसांनी सांगितले.

Web Title: Maharashtra is important for the country's economy, keep the state dynamic; PM Modi's advice to CM Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.