सीमाप्रश्नी केंद्राची मध्यस्थी; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 08:29 AM2022-12-10T08:29:29+5:302022-12-10T08:30:22+5:30
मविआ खासदारांनी शुक्रवारी गृहमंत्री शहा यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून सीमा भागात तणावाची स्थिती असून, हिंसाचार उफाळला आहे, याकडे या बैठकीत खासदारांनी शहा यांचे लक्ष वेधले
नवी दिल्ली : महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमाप्रश्न पेटला असताना, त्यावर फुंकर घालण्यासाठी आता केंद्र सरकार पुढाकार घेणार आहे. सीमावर्ती भागातील मराठी भाषकांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यासंदर्भात आपण स्वत: हस्तक्षेप करू, तसेच दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांना दिले.
मविआ खासदारांनी शुक्रवारी गृहमंत्री शहा यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून सीमा भागात तणावाची स्थिती असून, हिंसाचार उफाळला आहे, याकडे या बैठकीत खासदारांनी शहा यांचे लक्ष वेधले. मराठी भाषकांवर वारंवार हल्ले केले जात आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानामुळे ही स्थिती गंभीर झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.
१२ डिसेंबरनंतर बोलणार
१२ डिसेंबरला गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यानंतर, महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी खासदारांच्या शिष्टमंडळाला दिले. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, राजन विचारे, प्रियांका चतुर्वेदी, ओम राजेनिंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, फौजिया खान, डॉ.अमोल कोल्हे, काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर, रजनी पाटील यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
मुख्यमंत्र्यांची भूमिका मवाळ
महाराष्ट्राच्या दैवतांबद्दल वारंवार अपमानास्पद बोलले जात असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका मवाळ असल्याचा आरोप खासदार सुळे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अपमानास्पद वक्तव्ये दिली आहेत. महाराष्ट्राच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री विरोधकांना विश्वासात घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपचे काही खासदार पंतप्रधानांना भेटले, परंतु त्यांनी सीमावर्ती भागातील तणाव व अपमानास्पद वक्तव्याबद्दल काहीही न बोलणे हे दुर्दैवी असल्याचेही सुळे यांनी सांगितले.
चार खासदार पंतप्रधानांना भेटले
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक व मध्य प्रदेशच्या राज्यसभेतील खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यात महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश होता. यावेळी वादग्रस्त मुद्द्यांवर कोणतीही चर्चा झाली नाही. भाजपचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल पंतप्रधानांना पत्र पाठविले होते. ते पत्र व या बैठकीचा संबंध नाही. ही नियमित बैठक होती. अशा बैठकीत पंतप्रधान राज्यातील प्रश्न समजून घेतात, असे भाजपचे खा. प्रकाश जावडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. खा. उदयनराजे भोसले, खा. धनंजय महाडिक व खा. डॉ.अनिल बोंडे उपस्थित होते.