मुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र अग्रेसर
By admin | Published: November 16, 2015 03:45 AM2015-11-16T03:45:16+5:302015-11-16T03:45:16+5:30
पुत्ररत्न प्राप्तीसाठी देशात स्त्रीभ्रूणहत्या होत असतानाच मूल दत्तक घेणारी दाम्पत्ये मात्र मुलींना प्राधान्य देत असून, यात महाराष्ट्र अग्रेसर आहे.
नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
पुत्ररत्न प्राप्तीसाठी देशात स्त्रीभ्रूणहत्या होत असतानाच मूल दत्तक घेणारी दाम्पत्ये मात्र मुलींना प्राधान्य देत असून, यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो. या वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत देशभरात दत्तक घेण्यासाठीचे १९६० अर्ज करण्यात आले असून, त्यापैकी १२४१ अर्जांमध्ये मुलगी दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. याउलट मुलाला पसंती देणारे केवळ ७१८ अर्ज आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हरियाणा, बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये मुलामुलींच्या प्रमाणात प्रचंड तफावत असताना तेथेही दत्तक घेण्यास इच्छुक निपुत्रिक दाम्पत्ये मुलांच्या तुलनेत मुलींनाच प्राधान्य देत आहेत. या वर्षी हरियाणात एकूण १९ अर्जांपैकी ११ मुलींसाठी होते. बिहारमध्ये ८१पैकी ६४ व उत्तर प्रदेशात ९१पैकी ६३ अर्जांमध्ये मुलींना दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे.
दत्तक घेणे वाढले
भारतात गेल्या काही वर्षांमध्ये मुलांना दत्तक घेण्याची प्रथा वाढली आहे. २००४मध्ये एकूण २७२८ मुलांना दत्तक घेण्यात आले होते. तर २०१४-१५ दरम्यान ४,३५३ मुले दत्तक गेली. ‘कारा’च्या देखरेखीखाली ४०९ संस्था मुलांना दत्तक घेण्यात दाम्पत्यांची मदत करतात.