लसीकरण अभियानात उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र आघाडीवर, महाराष्ट्रात सात लाखांवर कोरोना योद्ध्यांचे लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 03:49 AM2021-02-18T03:49:16+5:302021-02-18T06:37:09+5:30
vaccination : कोरोनाविरोधात लढणाऱ्या देशभरातील ८८ लाख ५७ हजार ३४१ कोरोना योद्ध्यांना लस देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्रात ७ लाख ४० हजार ८३१ (८.२ टक्के) कोरोना योद्ध्यांचे लसीकरण झाले आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
कोरोनाविरोधात लढणाऱ्या देशभरातील ८८ लाख ५७ हजार ३४१ कोरोना योद्ध्यांना लस देण्यात आली आहे. यातील १ लाख ३४ हजार ६९१ लसी या मंगळवारी लावण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लसीकरण अभियानात उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत ९ लाख ३४ हजार ९६२ (१०.४ टक्के) लसीकरण करण्यात आले.
गेल्या २४ तासांमध्ये ११ हजार ६१० कोरोनाबाधित आढळले, तर १०० रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दिलासादायक बाब म्हणजे ११ हजार ८३३ कोरोना रुग्णांनी संसर्गावर मात केली. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या त्यामुळे १ कोटी ९ लाख ३७ हजार ३२० झाली आहे. यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार ८५८ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत, तर १ लाख ३६ हजार ५४९ सक्रिय रुग्णांवर (१.२५ टक्के) उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत १ लाख ५५ हजार ९१३ (१.४३ टक्के) रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. बुधवारी देशाचा कोरोनामुक्ती दर ९७.३३ टक्के नोंदवण्यात आला आहे. गेल्या एका दिवसात सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत ३२३ ची किरकोळ घट नोंदवण्यात आली आहे.
केरळमध्ये सर्वाधिक ४ हजार ९३७ कोरोनाबाधित आढळले, तर महाराष्ट्रात ३ हजार ६६३ कोरोनाबाधितांची भर पडली. दरम्यान, महाराष्ट्र ३९, केरळ १८, तामिळनाडू ७ तसेच कर्नाटकमध्ये ६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. देशात आतापर्यंत २० कोटी ७९ लाख ७७ हजार २२९ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ६ लाख ४४ हजार ९३१ तपासण्या मंगळवारी करण्यात आल्यात.
देशात ११,६१० नवे रुग्ण; मृत्युदरात घट
- देशात कोरोनाच्या संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या १ कोटी ६ लाख ४४ हजारांपेक्षा जास्त झाली असून त्यांचे प्रमाण ९७.३३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होत असून त्यांचे प्रमाण अवघे सव्वा टक्के आहे. कोरोनाच्या रुग्णांचा मृत्युदर १.४३ टक्के झाला आहे.
- बुधवारी कोरोनाचे ११,६१० नवे रुग्ण सापडले व १०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून बळींची एकूण संख्या १,५५,९१३ झाली आहे.
- देशात कोरोनाचे १,३६,५४९ उपचाराधीन रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांची संख्या १०९३७३२० असून त्यापैकी १०६४४८५८ जण बरे झाले.