लोकसभेत महाराष्ट्र; दापोली दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत करा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 05:54 AM2018-07-31T05:54:45+5:302018-07-31T05:55:13+5:30
आंबेनळी घाटातील दरीत बस कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी लोकसभेत सोमवारी केली.
नवी दिल्ली : आंबेनळी घाटातील दरीत बस कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी लोकसभेत सोमवारी केली. मात्र सरकारने त्यावर कोणतेही आश्वासन दिले नाही. सारे कर्मचारी दापोली कोकण कृषी विद्यापीठातले होते.
या अपघाताची माहिती देतांना सावंत म्हणाले की, ठार झालेले सारेजण ३५ ते ४५ वयाचे आहेत. त्यांची मुले १० ते १५ वर्षे वयोगटातील आहेत. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने आर्थिक मदत करावी, असे सावंत म्हणाले.
दमणगंगेचे पाणी चार धरणांत सोडा
नाशिक जिल्ह्यातील शेतीला मुबलक पाणी मिळावे यासाठी दमणगंगेचे पाणी एकदरे, वाघाड, करंजवण व ओझरखेड धरणांमध्ये सोडण्याची विनंती दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी केली. ते म्हणाले की दमणगंगेला गोदावरीशी जोडण्यासाठी पाहणी झाली आहे. तथापि दिंडोरी मतदारसंघात नांदगाव, येवला व चांदवडमध्ये बहुसंख्य शेतांना पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे दमणगंगेचे पाणी वरील चार धरणांना जोडल्यास टंचाई दूर होईल.
भीमाशंकरसाठी प्रस्तावच नाही
भगवान शंकराचे स्थान व १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री क्षेत्र भीमाशंकरच्या विकासासाठी केंद्राकडून निधी मिळण्यास राज्य सरकारच्या प्रस्तावाची प्रतीक्षा आहे. असे उत्तर केंद्रीय पर्यटनमंत्री अल्फान्सो यांनी शिरूरचे शिवाजीराव आढळराव यांना दिले. त्र्यंबकेश्वरप्रमाणेच भीमाशंकरलाही केंद्राने निधी द्यावा, अशी अढळराव पाटील यांची मागणी होती. पर्र्यटनमंत्री म्हणाले की निधी देण्यास हरकत नाही, मात्र राज्याकडून त्यासाठी प्रस्ताव आलेला नाही.
अंधेरी पुलाचा प्रश्न संसदेत गाजला
अंधेरीत रेल्वे पूल दुर्र्घटनेस जबाबदार कोण, असा प्रश्न काँग्रेसचे डॉ. सुबीरामी रेड्डी यांनी विचाला. पूल कोसळण्यास जबाबदार असलेल्यांचा शोध घेण्यासाठी समिती नेमली असून, तिचा अहवाल लवकरच मिळेल, असेही रेल्वे खात्याने लेखी उत्तरात म्हटले आहे. मुंबईतील सर्व रेल्वे पुलांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी मुंबई आयआयटीच्या सहकार्याने पुलांचे आॅडिट केले जाईल. देशभरातील रेल्वेच्या पुलांची पाहणी वर्षातून दोनदा होते. पुलांची दुरूस्ती, देखभाल, मजबूत करण्यासाठी प्रक्रिया, नव्या पुलाच्या उभारणीवर रेल्वेचे विशेष लक्ष असल्याचा दावा रेल्वेमंत्र्यांनी लेखी उत्तरात केला आहे.
३७४८ पुलांची दुरुस्ती
गेल्या पाच वर्षात देशात रेल्वेच्या ३ हजार ७४८ पुलांची दुरुस्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत १ एप्रिल २०१८ पर्यंत ४ हजार २७ पुलांच्या दुरुस्ती, देखभालीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र निधी वितरित करण्यात आल्याचे उत्तरात म्हटले आहे.