... मग २०२२ मध्ये येणाऱ्या कुंभमेळ्याला २०२१ मध्ये सरकारनं परवानगी का दिली?; आव्हाडांनी उपस्थित केला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 02:10 PM2021-04-21T14:10:14+5:302021-04-21T14:13:03+5:30
Kumbhmela : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला प्रश्न
देशात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव असतानाच आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यावरून राजकीय नेत्यांसह अनेक कलाकार मंडळींनीही टीका करत नाराजी दर्शवली होती. कुंभमेळ्यादरम्यान अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची माहितीही समोर आली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रातिनिधीक स्वरूपात आयोजित करण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान, आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
"कुंभ मेळ्याचं आयोजन दर १२ वर्षांनंतर केलं जातं. यानुसार कुंभ मेळा २०२२ मध्ये आयोजित झाला पाहिजे होता. असं असताना केंद्र आणि राज्य सरकारनं २०२१ मध्ये हा कुंभमेळा आयोजित करण्याची परवानगी कशी दिली? आता त्यांनी मृत्यूंची आणि कोरोनाचा प्रसार झाल्याची जबाबदारी स्वीकारावी," असं आव्हाड म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर प्रश्न उपस्थितीत केला आहे.
The kumbh mela comes after 12 years so it was to come in 2022 .... then y did the govt in central and state approve it in 2021....
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 20, 2021
they should now take the responsibility for deaths and #COVID19 spread
यासोबतच जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक ट्वीट करत नेपाळचे पूर्वीचे राजे ज्ञानेंद्र वीर विक्रम शाह देव आणि राणी कोमल यांना कोरोनाची लागण झाली असल्याचंही म्हटलं. ते महा कुंभमेळ्याला उपस्थित होते असंही त्यांनी म्हटलं आहे.
कुंभमेळा व्हायला नको होता - सोनू निगम
"मी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीबद्दल बोलणार नाही. पण मी हिंदू कुटुंबात जन्मलोय. हिंदू या नात्याने म्हणू शकतो की, कुंभमेळा व्हायलाच नको होता. देवाची कृपा की, आत्ता केवळ सांकेतिक झाला आहे. हा श्रद्धेचा मुद्दा आहे मान्य आहे. पण संपूर्ण जगात सध्या जी काही स्थिती आहे, ती बघता लोकांचा जीव अधिक महत्त्वाचा आहे. अशाकाळात शो सुद्धा व्हायला नकोत. कुठलाही शो सोशल डिस्टंसिंगचे पालन करून व्हायला हवा. पण तूर्तास नाहीच," असे सोनू निगमनं एका व्हिडीओद्वारे म्हटलं होतं.