Maharashtra Politics: यंदा नाहीच, पुढच्या वर्षी! सत्तासंघर्षावरील सुनावणी आता थेट जानेवारीत? SCचे तारीख पे तारीख
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 05:23 PM2022-12-06T17:23:01+5:302022-12-06T17:23:44+5:30
Maharashtra Politics: ठाकरे गट आणि शिंदे गटातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला आता नव्या वर्षात तारीख मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी करत ४० आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवर दावाही सांगितला. बंडखोर आमदारांपैकी १६ जणांना अपात्र ठरवण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. यासह अन्यही याचिका दाखल करण्यात आल्या. मात्र, सत्तासंघर्षावरील सुनावणी आता थेट पुढील वर्षी होण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यापूर्वी याप्रकरणाची सुनावणी ०१ नोव्हेंबर रोजी पार पडली होती. त्यावेळी दोन्ही गटांना काही कागदपत्रे सादर करण्यास सांगितली होती. तसेच दोन्ही बाजूंनी एकत्र बसून महत्त्वाचे मुद्दे ठरवावे, असे म्हणत न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना ४ आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानंतर याप्रकरणी २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणे अपेक्षित होते. पण त्यावेळी सुनावणी होऊ शकली नाही. आता याप्रकरणाच्या सुनावणीसाठी नव्या तारखांचा विचार सुरु आहे.
१० जानेवारीच्या दरम्यान सुनावणी होण्याची शक्यता
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीच्या प्रकरणात तारीख पे तारीखचे सत्र सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या प्रकरणाची सुनावणी पुढील वर्षी सुरु होऊ शकते. सन २०२३ मध्ये १० जानेवारीपासून या प्रकरणाचा मुख्य युक्तिवाद सुरू होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण १३ डिसेंबरला केवळ अनौपचारिक निर्देशांसाठी ऐकले जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, १२ ते १६ डिसेंबर या कालावधीत हिवाळी सुट्टीच्या आधीच्या आठवड्यात कुठलेही प्रकरण ऐकले जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयासमोर मेन्शन झाले. त्यामुळे आता नक्की केव्हा हे प्रकरणाची सुनावणी सुरु होणार आणि केव्हा निकाली लागणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"