ठाकरे सरकार कोसळणे भाजपाच्या पथ्थ्यावर, राष्ट्रपती निवडणुकीपासून लोकसभेपर्यंत फायदाच फायदा, असं आहे समिकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 01:33 PM2022-06-30T13:33:24+5:302022-06-30T13:35:07+5:30
सत्ता बदलामुळे राज्यातील समिकरणे मोठ्या प्रमामात बदलणार असून, महाविकास आघाडी सरकार कोसळणे भाजपाच्या पथ्थ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.
मुंबई - शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर अखेर उद्धव ठाकरे यांना काल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या राजीनाम्याबरोबरच गेल्या अडीच वर्षांपासून राज्याच्या सत्तेवर असलेले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे महाविकास आघाडी सरकारही कोसळले. मविआ सरकार कोसळल्याने आता राज्यात एकनाथ शिंदे गटाच्या पाठिंब्याने देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. या सत्ता बदलामुळे राज्यातील समिकरणे मोठ्या प्रमामात बदलणार असून, महाविकास आघाडी सरकार कोसळणे भाजपाच्या पथ्थ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्रातील सत्तांतरामुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी मिळाली आहे. सध्या लोकसभेमध्ये तब्बल १६८ खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार अशा तीन राज्यात भाजपाचं सरकार सत्तेवर आहे. त्यातच लोकसभा निवडणूक संपूर्ण ताकदीनिशी लढण्यासाठी भाजपाने महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू केली आहे. २०१९ मध्ये या तिन्ही राज्यातून भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांनी १६८ पैकी १४४ जागा जिंकल्या होत्या. आता २०२४ मध्ये त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल.
देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी दिली आहे. तर विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना संयुक्तरीत्या उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीमध्ये भाजपाला काही मते कमी पडत होती. मात्र आता महाराष्ट्रात सत्ता समिकरणं बदलल्याने भाजपाचे समर्थन असलेल्या उमेदवाराला अधिकची मतं मिळणार आहे.
राजकारणामध्ये परस्पर विरोधी विचारांच्या आघाड्यांची सरकारं फार काळ टिकत नाहीत. हल्लीचा इतिहास पाहिल्यास २०१५ मध्ये नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाची आघाडी झाली होती. मात्र दोन वर्षांतच ते सरकार कोसळले होते. तर २०१९ मध्ये महराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी झाली. मात्र या आघाडीत सुरुवातीपासून अनेक मतभेद होते. पण बाहेर सारं काही आलबेल असल्याचं सांगितलं जात होतं. अखेर शिवसेनेतील बंडखोरीमुळे हे सरकार पडले.
दरम्यान, राज्यात झालेल्या सत्तापरिवर्तनाचा आणि शिवसेनेतील बंडाळाचा परिणाम काही दिवसांनी होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही दिसणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आधीपासूनच कंबर कसली आहे. त्यात आता शिवसेना बंडखोरीमुळे कमकुवत झाल्याने त्याचाही फायदा भाजपाला होणार आहे. त्यामुळे मुंबईत स्वबळावर जिंकण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल.