Maharashtra Politics: म्हणून सत्तांतराच्या खेळीसाठी भाजपने ‘होमपीच’ बदलली, गुजरातऐवजी गुवाहाटी केंद्रस्थानी आली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 09:40 AM2022-06-23T09:40:52+5:302022-06-23T09:41:36+5:30
Maharashtra Politics: गुजरातमधूनच महाराष्ट्रातील नव्या सरकारची मुहूर्तमेढ करण्याचा डाव होता; मात्र ऐनवेळी बदललेल्या राजकीय हवामानाने विरोधकांचे बाऊन्सर व गुगलीने विकेट पडण्याची भीती लक्षात घेता सर्व प्रकारची खबरदारी घेत या खेळीसाठी गुजरातची ‘पीच’ बदलून आसाममधील गुवाहाटीत हा खेळ खेळण्याचा भाजपने निर्णय घेतल्याची चर्चा आता राजकीय गोटात रंगली आहे.
- रमाकांत पाटील
सुरत : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजप पुरस्कृत सरकार स्थापण्याच्या खेळीसाठी भाजपने खरं तर गुजरातच्या ‘होमपीच’ची निवड केली होती. गुजरातमधूनच महाराष्ट्रातील नव्या सरकारची मुहूर्तमेढ करण्याचा डाव होता; मात्र ऐनवेळी बदललेल्या राजकीय हवामानाने विरोधकांचे बाऊन्सर व गुगलीने विकेट पडण्याची भीती लक्षात घेता सर्व प्रकारची खबरदारी घेत या खेळीसाठी गुजरातची ‘पीच’ बदलून आसाममधील गुवाहाटीत हा खेळ खेळण्याचा भाजपने निर्णय घेतल्याची चर्चा आता राजकीय गोटात रंगली आहे.
विधान परिषदेच्या मतमोजणीत सर्वच राजकीय पक्ष दंग असताना शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदार व मंत्र्यांसह बंडाचा झेंडा घेत गुजरातच्या दिशेने रवाना झाले. या आमदारांच्या पाहुणचारासाठी गुजरातमधील प्रशासन व भाजपचे नेते यापूर्वीच सक्रिय झाले होते. बलसाड येथे तर गुजरातमधील भाजपचा बडा नेता या आमदारांच्या स्वागतासाठी थांबले होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली पुढे या सर्व आमदार व मंत्र्यांनी सुरत येथील हॉटेल गाठले आणि तेथेच मुक्काम ठोकला. बाहेर कुणाला कुणकुण लागण्यापूर्वीच हॉटेलमध्ये सर्व डावपेच ठरले आणि त्यानंतर गुजरातमधील भाजपचे नेते दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. सकाळी याबाबत मीडियाला चुणूक लागताच सर्व महाराष्ट्रातील राजकीय नेते जागे झाले आणि आमदारांची शोधाशोध सुरू झाली. तोपर्यंत पाणी वाहून गेले होते.
काय होते नियोजन?
गुजरातमध्ये एकनाथ शिंदे व त्यांचे समर्थक आमदार दाखल झाल्यानंतर नवीन सरकार स्थापण्याची पूर्ण प्रक्रिया केल्यानंतरच गुजरात सोडण्याचे नियोजन होते. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरत येथून या सर्व आमदारांना मंगळवारी दुपारीच गुजरातमधील आनंद, अहमदाबाद किंवा गांधीनगर या तीन ठिकाणी हलविण्याचे नियोजन होते. त्यासाठी आनंद व अहमदाबाद येथे हॉटेल आणि रिसोर्टचे बुकिंगही करण्यात आले होते. याचठिकाणी दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व आमदारांना आणण्यात येणार होते. तेथेच संख्याबळाचे व मंत्रिमंडळातील खाते वाटपाची जुळवाजुळव करून नवीन सरकार स्थापन करण्याची मुहूर्तमेढ रोवण्यात येणार होती.
का बदलले ठिकाण?
जसजसा दिवस पुढे जात होता तसतशा राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. खास करून शिवसेनेने भाजपवर थेट आरोप करीत गुजरातमधील भाजप सरकारचा फायदा घेत व केंद्राच्या दबावाने हे सर्व घडत असल्याचे सांगितले. याशिवाय सुरत येथे हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या एका आमदाराच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारी वाढण्याची शक्यता लक्षात घेत आणि काही महिन्यातच होऊ घातलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीवर त्याचे राजकीय परिणाम होऊ नये शिवाय महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे खापर भाजपचे होमपीच असलेल्या गुजरातवर येऊ नये या सर्व बाबींचा विचार करीत सायंकाळी उशिरा आमदारांना गुजरातमधून गुवाहाटीत हलविण्याचा निर्णय झाला.