चांगली आरोग्य सेवा देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या स्थानी; केंद्र सरकारचा रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 07:38 AM2022-02-17T07:38:18+5:302022-02-17T07:39:18+5:30
या आकडेवारीनुसार केरळ राज्यात देशात सर्वांत चांगल्या आरोग्य सेवा आहेत. दुसरे स्थान आंध्र प्रदेशचे, तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : आरोग्य सेवांचा विषय कोरोना महामारी असो की निवडणुकीचे दिवस महाराष्ट्र नेहमीच ठळक बातम्यांत राहिला. निवडणुकीच्या दिवसांत कोरोना आणि आरोग्य सेवांच्या व्यवस्थापनावरून महाराष्ट्रावर भाजपची टीका असते.
भाजप महाराष्ट्रावर करीत असलेली टीका आरोग्य मंत्रालयाकडील आकडेवारीशी काही जुळत नाही. कारण आरोग्य मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार महाराष्ट्र देशात इतर राज्यांच्या तुलनेत चांगल्या सेवा देणारे तिसरे राज्य आहे. नीती आयोगानेही आपल्या अहवालात याचा उल्लेख केला आहे.
या आकडेवारीनुसार केरळ राज्यात देशात सर्वांत चांगल्या आरोग्य सेवा आहेत. दुसरे स्थान आंध्र प्रदेशचे, तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे. उत्तर प्रदेश पुन्हा पुन्हा सर्वोत्तम सेवांचा प्रदेश सांगितला जातो. प्रत्यक्षात हे राज्य देशात निर्देशांक यादीत सगळ्यात खाली आहे. नीती आयोगाने महाराष्ट्राला ६४.५३, केरळला ७४.६५, तर आंध्र प्रदेशला ६५.३१ गुण दिले आहेत. खासगी क्षेत्राबद्दल बोलायचे तर मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत खूप चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. सरकारी आरोग्य सेवा महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात अपेक्षित दर्जाच्या नाहीत.