अयोध्येत उभारणार महाराष्ट्र सदन, आदित्य ठाकरेंची घोषणा; उत्तर प्रदेश सरकारशी चर्चा करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 07:45 AM2022-06-16T07:45:54+5:302022-06-16T07:46:13+5:30
अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या मुद्द्यावर उत्तर प्रदेश सरकारशी चर्चा करणार
अयोध्या :
अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या मुद्द्यावर उत्तर प्रदेश सरकारशी चर्चा करणार असल्याचे शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.
आदित्य ठाकरे यांनी बुधवारी अयोध्येत विविध ठिकाणी भेटी दिल्या. आपल्या या दौऱ्यात काहीही राजकारण नसून भगवान राम यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी झाल्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, सर्व केंद्रीय एजन्सी प्रचार साहित्य बनल्या आहेत.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अयोध्या हे देशाच्या आस्थेचे केंद्र आहे. २०१८ मध्ये आम्ही ही घोषणा दिली की, ‘प्रथम मंदिर, नंतर सरकार’ आणि शिवसेनेच्या या घोषणेनंतर मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला. आम्ही भगवान रामाला प्रार्थना करतो की, ‘आम्हाला शक्ती द्यावी, जेणेकरून लोकांची चांगली सेवा करता येईल.’
शरयू काठावर महाआरती
पूजा करण्यापूर्वी ते म्हणाले, ‘रामाचे भक्त म्हणून आम्ही येथे आलो आहोत. येथे साधू, संतांकडून आमचे जोरदार स्वागत केले जात आहे.’ आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अयोध्येत शरयू काठावर सायंकाळी महाआरती करण्यात आली. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते.