निवास महाराष्ट्र सदनात, उपचार हरियाणा भवनात; हरिभाऊ राठोड यांना आला अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 02:23 AM2017-11-01T02:23:13+5:302017-11-01T02:23:31+5:30
नवीन महाराष्ट्र सदनात वैद्यकीय उपचाराची सोय उपलब्ध नसल्याने येथे थांबलेल्या आमदाराला २४ तास आरोग्य सेवा देणा-या हरियाणा भवनात उपचार घ्यावे लागले.
- विकास झाडे
नवी दिल्ली : नवीन महाराष्ट्र सदनात वैद्यकीय उपचाराची सोय उपलब्ध नसल्याने येथे थांबलेल्या आमदाराला २४ तास आरोग्य सेवा देणा-या हरियाणा भवनात उपचार घ्यावे लागले.
विधान परिषदेचे सदस्य हरिभाऊ राठोड एका शासकीय बैठकीसाठी सोमवारी रात्री दिल्लीत आलेत. त्यांचा मुक्काम नवीन महाराष्टÑ सदनात होता. मंगळवारी सकाळी त्यांचा अचानक रक्तदाब वाढला. त्यांनी स्वागतकक्षात फोन करून माहिती दिली व तातडीने डॉक्टर उपलब्ध करून द्या, अशी विनंती केली. तेव्हा आपल्याकडे डॉक्टर नसतो आणि तशी यंत्रणाही नाही, अशी माहिती देण्यात आली. तुम्ही डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात जा ते २४ तास उघडे असते असा सल्ला देण्यात आला. आमदार राठोड यांनी त्यांच्याकडील औषधी घेऊन दोन तास काढले. नंतर दिल्लीतील एका सहकाºयास बोलावून कोपर्निकस मार्गावरील हरियाणा भवनात डॉ. अग्रवाल यांच्याकडून तपासणी करून घेतली.
मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार
प्रदेश भाजपाच्या वैद्यकीय सेलचे संयोजक डॉ. अजित गोपचाडे यांनी सदनात उपचार होत नसल्याची खंत व्यक्त केली. त्यांनी नितीन गडकरी यांना हा किस्सा सांगितला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्टÑ सदनात वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी निवेदन देणार असल्याचे ते म्हणाले.
जबाबदार कोण?
महाराष्ट्र सदनातील राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांनी फोन उचलला नाही. वैद्यकीय सेवेसाठी महाराष्ट्र सदनाकडून राज्य सरकारला काही प्रस्ताव पाठविण्यात आला आहे काय? असे मेसेजवर विचारले, त्याचेही उत्तर मिळाले नाही. सहायक निवासी आयुक्त (प्रशासन) सुमन रावत चंद्र यांनीही वरिष्ठ अधिकाºयांकडे बोट दाखविले.
महाराष्ट्र सदनात एखादा माणूस उपचाराविना केव्हा मरेल काही नेम नाही. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे.
- आमदार हरिभाऊ राठोड