महाराष्ट्र समिती-संविधान मोर्चा एकत्र
By admin | Published: September 24, 2014 02:50 AM2014-09-24T02:50:43+5:302014-09-24T02:50:43+5:30
महायुती आणि आघाडी सरकारला पर्याय देण्यासाठी तिसरी आघाडी म्हणून महाराष्ट्र डावी लोकशाही आघाडी समितीसोबत संविधान मोर्चाने एकत्र येत महाराष्ट्र समिती-संविधान मोर्चा ही नवी आघाडी स्थापन केली आहे.
मुंबई : महायुती आणि आघाडी सरकारला पर्याय देण्यासाठी तिसरी आघाडी म्हणून महाराष्ट्र डावी लोकशाही आघाडी समितीसोबत संविधान मोर्चाने एकत्र येत महाराष्ट्र समिती-संविधान मोर्चा ही नवी आघाडी स्थापन केली आहे. राज्यातील २८८ जागा लढण्याचा निर्धार केलेल्या या आघाडीने सोमवारी रात्री झालेल्या चर्चेनंतर आज १२४ जागांची घोषणा केली.
महाराष्ट्र डावी लोकशाही आघाडी समितीत शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (सेक्युलर), रिपाइं (आरके), सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी संघटना यांचा समावेश आहे. तर संविधान मोर्चामध्ये रिपब्लिकन सेना, रिपाइं (खोब्रागडे),
शिवराज्य पक्ष, लोकशासन आंदोलन पक्ष, देश बचाव पार्टी या पक्षांसह ओबीसी सेवा संघ, ओबीसी आरक्षण बचाव या संघटनांचा समावेश आहे.
तरी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या समावेशासाठी चर्चा सुरू असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. तरी काही जागा त्यांच्यासाठी सोडण्याची तयारीही आघाडीने दाखवल्याचे त्यांनी सांगितले. आघाडी सरकारने केलेले भ्रष्टाचार आणि गेल्या आठ दिवसांपासून महायुतीत जागा वाटप व सत्तेसाठी चाललेली आदळआपट जनतेने पाहिली आहे.
त्यामुळे राज्याला तिसरा पर्याय म्हणून पुरोगामी विचारांची तिसरी आघाडी स्थापन केल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, २६ सप्टेंबरला अलिबाग येथे राष्ट्रीय नेते शरद यादव यांना स्टार प्रचारक म्हणून आमंत्रित केल्याचे पाटील यांनी सांगितले.
संविधान मोर्चा व महाराष्ट्र समिती हे सत्तेसाठी एकत्र आले नसून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आल्याचे लोकशासन आंदोलन पक्षाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे-पाटील यांनी सांगितले. त्यामुळे लोकशाही आंदोलन पक्षाला एकही जागा मिळाली नाही, तरी आघाडीत राहण्याची तयारी कोळसे-पाटील यांनी दर्शवली. (प्रतिनिधी)