मुंबईत लोकल रेल्वे चालविण्याची महाराष्ट्राने मागितली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 01:01 AM2020-05-20T01:01:39+5:302020-05-20T01:02:40+5:30
महाराष्ट्राने केंद्र सरकारला म्हटले आहे की, मुंबईत लोकल रेल्वे चालवण्याची परवानगी केंद्राने द्यावी व त्यासाठी काही नियमही ते लागू करू शकते.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाने श्रमिक रेल्वे चालवण्यासाठी राज्यांकडून हव्या असलेल्या मंजुरीच्या नियमांत मंगळवारी बदल केले. ज्या राज्यात रेल्वे संपेल त्या राज्याची मंजुरी नव्या नियमांत गरजेची नसेल. काही प्रश्न अनुत्तरित असले तरी महाराष्ट्र आणि गुजरात राज्य रेल्वे मंत्रालयाच्या अडचणी वाढवताना दिसत आहेत.
महाराष्ट्राने केंद्र सरकारला म्हटले आहे की, मुंबईत लोकल रेल्वे चालवण्याची परवानगी केंद्राने द्यावी व त्यासाठी काही नियमही ते लागू करू शकते. सरकारी कर्मचारी, अत्यावश्यक सेवा आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासाठी लोकल रेल्वे आवश्यक आहे. आवश्यकता असेल तर रेल्वे स्थानकांवर राज्याचे पोलीस जवान आणि निमलष्करी दलांनाही तैनात करण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो. गुजरातने म्हटले आहे की, आमच्याकडे उद्योग/कारखाने सुरू होत आहेत. आम्हाला मजुरांची गरज असल्यामुळे आमच्याकडे रेल्वे सेवा दिली जावी. अनेक राज्यांतून कामगार/मजूर गुजरातला परत येऊ इच्छितात. महाराष्ट्राने म्हटले आहे की, लोकल रेल्वेशिवाय मुंबई अपूर्ण आहे. केंद्राने आम्हाला नियमांसह रेल्वे चालवण्याची परवानगी द्यावी.