रक्तपिशव्यांचा योग्य वापर करण्यात महाराष्ट्र देशात अव्वल; गुजरातचीही लक्षणीय कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 05:23 AM2022-10-07T05:23:36+5:302022-10-07T05:24:25+5:30
महाराष्ट्राने देशात सलग दुसऱ्या वर्षी पहिला क्रमांक पटकाविला आहे.
अहमदाबाद: रक्तपेढ्यांमध्ये जमा केलेल्या रक्ताचा व्यवस्थित पद्धतीने उपयोग तसेच अयोग्य रक्तपिशव्या वापरातून बाद करण्यात महाराष्ट्राने देशात सलग दुसऱ्या वर्षी पहिला क्रमांक पटकाविला आहे. तर उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानावर आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात रक्तपेढ्यांची संख्या भलेही अधिक असेल; पण रक्तसंकलनाच्या बाबतीत हे राज्य गुजरातपेक्षा मागे आहे.
ई-रक्तकोष पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षांपासून देशात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रक्तपिशव्या वापरातून बाद करण्यात आल्या. २०२१ साली महाराष्ट्रात ५२९१० रक्तपिशव्या वापरातून बाद झाल्या. हेच प्रमाण महाराष्ट्रामध्ये यंदाच्या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांत ३३७९० रक्तपिशव्या इतके होते. गुजरातमध्ये २०२१ साली ३६००५ रक्तपिशव्या वापरण्यास अयोग्य ठरविण्यात आल्या.
पश्चिम बंगालमध्ये यंदाच्या जूनपर्यंत १८११२ व मागील वर्षी २२२९० रक्तपिशव्या वापरास अयोग्य ठरविण्यात आल्या. हेच प्रमाण उत्तर प्रदेशमध्ये यंदाच्या वर्षी ९००० व गेल्या वर्षी १७९०४ रक्तपिशव्या इतके होते. केरळमध्ये यंदाच्या वर्षी १७९०४ व मागील वर्षात ३०२९१ रक्तपिशव्या वापरातून बाद करण्यात आल्या.
महाराष्ट्रात दीड वर्षात २६ लाख युनिट रक्ताचा वापर
महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षांत २६ लाख रक्तपिशव्यांचा उपयोग करण्यात आला. यंदाच्या वर्षी पहिल्या सात महिन्यांत १० लाखांहून अधिक रक्तपिशव्या वापरात आणल्या गेल्या. हेच प्रमाण या राज्यात मागील वर्षी १६ लाख इतके होते. उत्तर प्रदेशात ११ लाखांहून अधिक रक्तपिशव्यांपैकी गेल्या वर्षी ७.५ लाखांहून अधिक व यावर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांत चार लाखांहून जास्त रक्तपिशव्यांचा उपयोग करण्यात आला. याच कालावधीत गुजरातने १० लाखांहून अधिक रक्तपिशव्यांचा वापर झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी अधिक रक्तदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी यंदा १७ सप्टेंबर रोजी देशात मोठ्या प्रमाणावर रक्तदान झाले. कोरोनाची साथ कमी झाल्यानंतर रक्तदानाचे प्रमाण देशात टप्प्याटप्प्याने वाढले, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
कुठे-किती रक्तपेढ्या?
राज्य रक्तपेढ्या
उत्तर प्रदेश ४६०
महाराष्ट्र ३७४
तामिळनाडू ३३९
कर्नाटक २७५
तेलंगणा २६०
आंध्र प्रदेश २२१
केरळ २०२
राजस्थान २१३
गुजरात १८३
प. बंगाल १५४