Vidhan sabha 2019 : भाजप उमेदवारांची नावे अखेर निश्चित, २०% आमदारांना मिळणार नारळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 06:54 AM2019-09-30T06:54:51+5:302019-09-30T06:55:03+5:30
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत या नावांची घोषणा केव्हाही केली जाऊ शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ९० टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवार पक्षाने निश्चित केले आहेत. काही जागांचा निर्णय व्हायचा आहे. जवळपास २० टक्के जागांवरील विद्यमान आमदारांना बदलण्याचा निर्णय झालेला आहे. या जागांवर त्याला आपल्याच नेत्यांच्या नाराजीला तोंड द्यावे लागू शकते. अशा जागांवरील उमेदवारांची नावे उशिरा जाहीर केली जाऊ शकतात. या बैठकीत शिवसेनेसोबच्या जागा वाटपावरही चर्चा झाली. उच्चपदस्थ सूत्रांनुसार भाजपची वरिष्ठ समिती शिवसेनेसाठी फक्त १२४ जागा सोडायला तयार आहे आणि स्वत: भाजप छोट्या मित्रपक्षांसह १६४ जागा लढेल.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पाच वाजता सुरु झाली. या बैठकीत प्रथम हरयाणाच्या जागांवर चर्चा झाली. त्यानंतर रात्री ८ वाजता महाराष्ट्राबाबत चर्चा झाली. या बैठकीत कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, संघटन महामंत्री बी. एल. संतोष, महिला मोर्चाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्यासह शाहनवाज हुसैन, नरेंद्र सिंह तोमर आणि अनिल जैन हे सहभागी झाले होते.
भाजपसाठी खास आहेत निवडणुका
अमित शहा यांनी यापूर्वी २६ सप्टेंबर रोजी राज्याच्या कोअर कमिटी सदस्यांसोबत उमेदवारांच्या नावांबाबत आणि सहयोगी पक्षासोबत जागा वाटपासंदर्भात चर्चा केली होती. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांनंतर ही पहिला विधानसभा निवडणूक आहे. भाजपसाठी ही निवडणूक यासाठीही खास आहे कारण, दोन्ही राज्यात प्रथमच सत्ता भाजपकडे आहे. महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ४ आॅक्टोबर आहे. मतमोजणी २४ आॅक्टोबर रोजी आहे.