चलनी नोटावर उमटणार महाराष्ट्र!
By Admin | Published: August 27, 2015 04:23 AM2015-08-27T04:23:00+5:302015-08-27T11:53:32+5:30
दहा, शंभर, पाचशे व एक हजारांच्या चलनी नोटांवर आता महाराष्ट्र दिसणार आहे. अजिंठा- वेरूळ व एलिफंटा लेण्या, मुंबईचे छत्रपती शिवाजी टर्मिनस, कास पठार, कोयना वन्यजीव
- रघुनाथ पांडे, नवी दिल्ली
दहा, शंभर, पाचशे व एक हजारांच्या चलनी नोटांवर आता महाराष्ट्र दिसणार आहे. अजिंठा- वेरूळ व एलिफंटा लेण्या, मुंबईचे छत्रपती शिवाजी टर्मिनस, कास पठार, कोयना वन्यजीव अभयारण्य, चंदोली राष्ट्रीय उद्यान व राधानगरी वन्यजीव अभयारण्याचे चित्र नोटांवर उमटलेले पाहायला मिळेल. दिवाळीदरम्यान हा बदल होणार असून, जागतिक वारसा असणाऱ्या देशातील ३० स्थळांच्या चित्रांची छपाई नोटांवर होईल.
केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेला नोटांच्या नव्या डिझाईनमध्ये भारतातील जागतिक वारसा सांगणाऱ्या स्थळांचा समावेश करण्यासाठी परवानगी दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नोटांच्या नव्या मालिकेत महाराष्ट्रातीलही स्थळांची छपाई होईल.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले की, १९ जून २०१५ रोजी याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला असून, भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटांच्या सुरक्षेबाबत बी- क्वालिफिकेशन बीड (पीक्यूबी) जारी केली आहे. नोटांची नवी मालिका अधिक सुरक्षित व प्रगत राहण्यासाठी केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला काही सूचना केल्या असून बँकेने त्यावर कामही सुरू केले आहे.
युनेस्कोने जागतिक वारसा स्थानांच्या यादीत भारतातील ज्या ३० स्थळांचा समावेश केला आहे, त्यात सहा नैसर्गिक, तर २४ सांस्कृतिक स्थळे आहेत.
१ जुलै २०१२ रोजी पश्चिम घाटास समाविष्ट करण्यात आले असल्याने कास पठार, कोयना वन्यजीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान व राधानगरी वन्यजीव अभयारण्य आता जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत.