महाराष्ट्राच्या १४ एफएम चॅनल्सना बोलीदार नाही
By admin | Published: August 19, 2015 01:15 AM2015-08-19T01:15:33+5:302015-08-19T01:15:33+5:30
महाराष्ट्राच्या २९ एफएम चॅनल्सपैकी १४ चॅनल्ससाठी वाईट दिवस आले आहेत. ई-लिलावात या १४ चॅनल्ससाठी एकाही कंपनीने बोली लावली नाही
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या २९ एफएम चॅनल्सपैकी १४ चॅनल्ससाठी वाईट दिवस आले आहेत. ई-लिलावात या १४ चॅनल्ससाठी एकाही कंपनीने बोली लावली नाही. राज्यातील कमी मान्सूनचा हा परिणाम असल्याचे बोलले जाते. जाहिरातीमधून मिळणाऱ्या उत्पन्नात घट होईल, या भीतीपोटी खासगी एफएम कंपन्यांनी बोली लावण्याची जोखीम पत्करली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
एफएम रेडियो चॅनल्सच्या लिलावाच्या तिसऱ्या टप्प्यातील पहिल्या फेरीत ६९ शहरांच्या १३५ चॅनल्ससाठी गेल्या २७ जुलैपासून बोली लावण्यात येत आहे. हा लिलाव केव्हा संपणार याचा अंदाज बांधणे कठीण आहे. कारण ज्या शहरांमध्ये कंपन्यांना जाहिरातीतून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे त्या शहरांसाठी जास्त बोली लावण्यात येत आहे. परंतु १३ शहरांच्या ४३ चॅनल्ससाठी अद्याप एकाही कंपनीने बोली लावली नाही. लिलावाच्या १६ व्या दिवशी ६४ फेरीच्या बोली लागल्या. त्यानंतर ५६ शहरांच्या ९२ चॅनल्ससाठी कंपन्यांनी एकूण १०९० कोटी रुपयांची बोली लावलेली आहे, जी या चॅनल्सच्या एकूण राखीव ४५१ कोटी रुपयांपेक्षा ६३९ कोटींची जास्त आहे. त्यामुळे माहिती व प्रसारण खात्याला मोठा नफा होईल, यात शंका नाही. कंपन्यांनी महानगरांना प्राधान्य दिले आहे तर छोट्या व एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांबाबत कंपन्यांनी रुची दाखविलेली नाही. (प्रतिनिधी)