१० वर्षांत शेती क्षेत्रात महाराष्ट्राची घसरण
By admin | Published: March 21, 2016 02:49 AM2016-03-21T02:49:31+5:302016-03-21T02:49:31+5:30
महाराष्ट्रात गत दहा वर्षांत शेतीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे, तर मध्यप्रदेश शेतीच्या लागवडीबाबत आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
महाराष्ट्रात गत दहा वर्षांत शेतीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे, तर मध्यप्रदेश शेतीच्या लागवडीबाबत आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
महाराष्ट्रात लागवडीखालील क्षेत्रात १३ लाख हेक्टरची घट झाली आहे. २०१४-१५ पर्यंत गत दहा वर्षांत ही घसरण झाली आहे. लागवडीखालील क्षेत्र १.२७ कोटी हेक्टरवरून १.१४ कोटी हेक्टर झाले आहे. गुजरातमध्येही गत दहा वर्षांत शेती क्षेत्रात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. लागवडीखालील क्षेत्र ३९.६७ लाख हेक्टरवरून ३५.२७ लाख हेक्टर झाले आहे. शेतीच्या क्षेत्रात घसरण झालेल्या अन्य राज्यांत प्रामुख्याने आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, ओडिशा, हिमाचल प्रदेश आणि केरळ यांचा समावेश आहे. परंतु महाराष्ट्रातील शेतीतील घसरण अधिक आहे.
सरकार या उत्पन्नाबाबत समाधानी आहे. कारण, देशभरातील लागवडीखालील क्षेत्र हे समाधानकारक आहे. त्यात मोठी घसरण झालेली नाही. देशभरात यंदा पावसाने पाहिजे तशी साथ दिलेली नसतानाही उत्पन्न समाधानकारक असल्याने कृषी मंत्रालय उत्साहित आहे. दरम्यान, देशात दरवर्षी २० ते २५ हजार हेक्टर लागवडीखालील जमीन ही विना लागवडीखाली जाते. याबाबत सरकारने चिंता व्यक्त केली आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी जमिनीचा वापर होत आहे. अशा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर मंजुरी दिली जात आहे.