जागतिक नेत्यांसमोर रंगणार महाराष्ट्राची लावणी; जी-२० देशांना दिसणार भारताची ताकद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 11:46 AM2023-09-06T11:46:23+5:302023-09-06T12:37:17+5:30
नेत्यांच्या स्वागतासाठी ‘अवतार’ सज्ज
- संजय शर्मा
नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मदर ऑफ डेमोक्रसी’ प्रदर्शनात राष्ट्राध्यक्ष आणि इतर प्रमुख नेत्यांचे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार केलेले ‘अवतार’ स्वागतासाठी सज्ज आहेत. यावेळी भारताची जगातील वाढती आर्थिक शक्ती दाखवण्याबरोबरच देशाचा गौरवशाली इतिहास व समृद्ध सांस्कृतिक वारसाही दाखवला जाणार आहे.
“प्रदर्शन परिसरात नेत्यांचे आगमन झाल्यावर, राज्यप्रमुख, प्रतिनिधी आणि इतर पाहुण्यांचे ‘अवतार’द्वारे स्वागत केले जाईल जे त्यांना प्रदर्शनाचे संक्षिप्त दर्शन घडवेल. संमेलनाच्या ठिकाणी प्रगती मैदानात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दालनात भारत डिजिटल व्यवहार व प्रबळ आर्थिक शक्ती म्हणून पुढे येत असल्याचे प्रदर्शन दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबर जी-२० देशांच्या प्रतिनिधींना या ठिकाणी रूपे कार्ड दिले जाईल. या रूपे कार्डद्वारेच सर्व प्रतिनिधींना पेमेंट करण्यास सांगण्यात येणार आहे.
शिवाजी महाराजांचा पराक्रम जगभर
भारताचा गौरवशाली इतिहास सांगणाऱ्या दालनात चंद्रगुप्त मौर्य यांच्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांची सविस्तर माहिती देणारे प्रदर्शन...वेशभूषा, भाषा, खाणे-पिणे, नृत्य, गायनाच्या संस्कृतीचीही प्रगती मैदानात पाहुण्यांना झलक पाहावयास मिळेल. भांगडा, गिद्दा, लावणी, कुचीपुडी, कत्थक, गरबा, राजस्थानी नृत्यही येथे सादर केले जाणार आहे.
फ्रान्स म्हणतो....
भारतातील जी-२० शिखर परिषद ही प्रमुख जागतिक आव्हानांना संयुक्त प्रतिसादांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रगती करण्याची संधी असेल, असे मत व्यक्त करीत फ्रान्सने मंगळवारी आपले राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या परिषदेतील सहभागाची घोषणा केली. मॅक्रॉन यांच्या कार्यालयाने सांगितले की, ते ९ आणि १० सप्टेंबर रोजी शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी दिल्लीला जातील.