महाराष्ट्राच्या वाट्याला २,०७५ कोटी
By admin | Published: April 6, 2015 01:04 AM2015-04-06T01:04:37+5:302015-04-06T01:04:37+5:30
केंद्रीय करांच्या वाट्यापोटी १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यांना वर्ष २०१५-१६ मध्ये हस्तांतरित करायच्या निधीचा ३७,४२० कोटी
नवी दिल्ली : केंद्रीय करांच्या वाट्यापोटी १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यांना वर्ष २०१५-१६ मध्ये हस्तांतरित करायच्या निधीचा ३७,४२० कोटी रुपयांचा पहिला हप्ता केंद्र सरकारने रविवारी जारी केला. त्यानुसार महाराष्ट्राला २,०७५ कोटी रुपये मिळणार आहेत.
वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्र सरकारने यंदाच्या वर्षासाठीचा पहिला हप्ता म्हणून सर्व राज्यांना मिळून ३७,४२० कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे, असे वित्त मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
१४ व्या वित्त आयोगाने केंद्रीय करांमधील राज्यांच्या वाट्यामध्ये १० टक्के एवढी विक्रमी वाढ करण्याची शिफारस केली. ती केंद्र सरकारने स्वीकारल्याने वर्ष २०१४-१५ मध्ये राज्यांना १.७८ कोटी रुपयांचा वाढीव निधी केंद्राकडून मिळणार आहे. चालू वर्षात राज्यांना एकूण ५.२६ लाख कोटी रुपये मिळतील. गेल्या वर्षी ही रक्कम ३.४८ लाख कोटी रुपये होती. २०१९-२० पर्यंतच्या पाच वर्षांत राज्यांना केंद्रीय करांमधील वाट्यापोटी एकूण ३९.४८लाख कोटी रुपये मिळायचे आहेत.
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील वित्त आयोगाने वित्तीय तूट असलेल्या ११ राज्यांना ४८,९०६ कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्याचीही शिफारस केली. पाच वर्षात मिळून या राज्यांना १.९८ लाख कोटी रुपये जादा मिळतील. यंदा विभाजनानंतरचे आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल व जम्मू-काश्मीरला हे अनुदान मिळेल.
(लोकमत न्यूज नेटवर्क)