महाठग: ‘पीएमओ’ अधिकारी म्हणून मिरवला, बैठकही घेतली! Z+ सुरक्षा मिळालेल्या तोतयाला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 05:54 AM2023-03-18T05:54:23+5:302023-03-18T05:54:50+5:30

दोन आठवड्यांच्या आत श्रीनगरला दुसऱ्या दौऱ्यावर आल्यानंतर संशयाच्या भोवऱ्यात आला.

mahathag as a pmo officer also held a meeting arrest a thief with z plus security | महाठग: ‘पीएमओ’ अधिकारी म्हणून मिरवला, बैठकही घेतली! Z+ सुरक्षा मिळालेल्या तोतयाला बेड्या

महाठग: ‘पीएमओ’ अधिकारी म्हणून मिरवला, बैठकही घेतली! Z+ सुरक्षा मिळालेल्या तोतयाला बेड्या

googlenewsNext

श्रीनगर : झेड-प्लस सुरक्षा कवच, बुलेटप्रूफ एसयूव्ही, पंचतारांकित हॉटेलमध्ये अधिकृत निवास आणि बरेच काही... गुजरातमधील एका तोतयाने पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा बनाव करून जम्मू- काश्मीर प्रशासन आणि तेथील सुरक्षा व्यवस्था चांगलीच वेठीस धरल्याचे उघडकीस आले आहे.

अनेक बैठका...

या तोतयाचे नाव आहे किरणभाई पटेल. कहर म्हणजे त्याने या वर्षाच्या सुरुवातीला श्रीनगरच्या दोन भेटींमध्ये अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या! पंतप्रधान कार्यालयातील रणनीतीविषयक विभागातील अतिरिक्त संचालक म्हणून मिरवणाऱ्या किरणला १० दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती, परंतु पोलिसांनी त्याच्या अटकेबाबत गुप्तता पाळली होती. गुरुवारी,  त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर त्याच्या अटकेचा तपशील समोर आला.

ट्विटरवर अधिकृत खाते

किरणभाईचे ट्विटरवर अधिकृत खाते आहे आणि भाजप गुजरातचे सरचिटणीस प्रदीपसिंह वाघेला यांच्यासह त्यांचे एक हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांनी काश्मीरमधील त्यांच्या अधिकृत भेटीचे अनेक व्हिडीओ आणि चित्रे शेअर केली आहेत. त्यापैकी शेवटचा २ मार्च रोजीचा होता.

अधिकाऱ्यांबरोबर पर्यटनवृद्धीसाठी चर्चा

किरणभाईने निमलष्करी दल आणि पोलिसांच्या संरक्षणात विविध ठिकाणी प्रवास करतानाचे अनेक व्हिडीओ आहेत. तो निमलष्करी रक्षकांसह बडगाममधील दूधपथरी येथे बर्फातून चालताना दिसतो. श्रीनगरमधील लाल चौकातील क्लॉक टॉवरसमोरही तो फोटोसाठी पोज देताना दिसतो. 

सूत्रांनुसार किरणने तेथील अधिकाऱ्यांशी गुजरातमधून अधिक पर्यटक आकर्षित करण्याच्या योजनांवर तसेच दूधपात्रीला पर्यटनस्थळ बनवण्याबाबत चर्चा केली. 

दुसऱ्यांदा दौरा केला अन् अडकला

किरणभाई दोन आठवड्यांच्या आत श्रीनगरला दुसऱ्या दौऱ्यावर आल्यानंतर संशयाच्या भोवऱ्यात आला. जिल्हा दंडाधिकारी असलेल्या एका आयएएस अधिकाऱ्याने गेल्या महिन्यात एका वरिष्ठ पीएमओ अधिकाऱ्याच्या भेटीबाबत पोलिसांना माहिती दिली होते. दरम्यान, गुप्तचर विभागानेही पोलिसांना सावध केले. किरणभाईची पार्श्वभूमी पडताळून पाहिल्यानंतर पोलिसांना श्रीनगरमधील हॉटेलमधून त्याला अटक केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: mahathag as a pmo officer also held a meeting arrest a thief with z plus security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.