Presidential Election 2022: राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांना उमेदवार मिळेना; महात्मा गांधींच्या नातूचा नकार, शोधाशोध सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 07:18 PM2022-06-20T19:18:34+5:302022-06-20T19:19:20+5:30

Presidential Election 2022: शरद पवार, फारूक अब्दुल्ला यांच्यानंतर गोपाळकृष्ण गांधी यांनीही विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी स्पष्ट नकार दिला आहे.

mahatma gandhi grandson gopalkrishna gandhi rejects presidential election 2022 candidates offer from opposition | Presidential Election 2022: राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांना उमेदवार मिळेना; महात्मा गांधींच्या नातूचा नकार, शोधाशोध सुरूच

Presidential Election 2022: राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांना उमेदवार मिळेना; महात्मा गांधींच्या नातूचा नकार, शोधाशोध सुरूच

googlenewsNext

नवी दिल्ली: राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीनंतर आता देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची (Presidential Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. भाजप आणि विरोधी पक्षाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. विरोधकांनी आतापर्यंत काही बड्या नेत्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत विचारणा केली होती. मात्र, सर्वांनीच उमेदवारीसाठी नकार दिल्याने विरोधकांसमोर मोठा पेच उभा राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच भाजपकडूनही चाचपणी सुरू असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जर्मनी दौऱ्यापूर्वी यावर शिक्कामोर्तब केले जाईल, अशी चर्चा सुरू आहे. 

शरद पवारांनी राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्याही नावाचा विचार करण्यात आला होता. मात्र, फारूक अब्दुल्ला यांनीही याला स्पष्ट नकार दिला. अलीकडेच दिल्लीत विरोधकांची एक मोठी बैठक झाली. त्यानंतर आता महात्मा गांधी यांचे नातू तसेच पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांनीदेखील विरोधी पक्षांचा हा प्रस्ताव नाकारला आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी माझ्यापेक्षा दुसरा एखादा सर्वसमहमती असलेला उमेदवार द्यावा, असे गोपाळकृष्ण गांधी म्हणाले आहेत.

निवेदन जारी करत विरोधकांचा हा प्रस्ताव नाकारला

राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी विरोधी पक्षाकडून गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावाचा विचार केला जात होता. मात्र गोपाळकृष्ण गांधी यांनी एक निवेदन जारी करत विरोधकांचा हा प्रस्ताव नाकारला आहे. काही विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मला उमेदवारी देण्याचा विचार केला जातोय. त्यांचा खूप खूप आभारी आहे. मात्र राष्ट्रपतीपदाचा उमेदवार राष्ट्रीय पातळीवर सर्वसहमती निर्माण करणार असावा. माझ्यापेक्षा दुसरा एखादा व्यक्ती हे प्रभावीपणे करु शकेल असे मला वाटते. त्यामुळे अशाच एखाद्या व्यक्तीला ती संधी द्यावी, अशी विनंती मी या नेत्यांना करतो, असे गोपाळकृष्ण गांधी आपल्या निवेदनात म्हणाले आहेत.

दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ जून असणार आहे. १८ जुलै रोजी मतदान आणि २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. आयोगाने मतदानाच्या दिवशी कोविड प्रोटोकॉल पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य ५,४३,२३१ आहे, तर खासदारांच्या एकूण मतांचे मूल्य ५,४३,२०० आहे. दोन्ही मतदारांच्या मतांचे एकूण मूल्य १०,८६,४३१ आहे. खासदारांच्या एका मताचे मूल्य ७०० आहे. खासदारांना संसद भवनात मतदान करणे बंधनकारक असणार आहे. तर आमदाय त्यांच्या त्यांच्या राज्यात विधानभवनात मतदान करतील.
 

Web Title: mahatma gandhi grandson gopalkrishna gandhi rejects presidential election 2022 candidates offer from opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.