तुम्हाला जॉर्ज वॉशिंग्टनची जागा घ्यायची आहे का?, गांधीजींच्या पणतूंचा ट्रम्प यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 01:38 PM2019-09-30T13:38:15+5:302019-09-30T13:45:39+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फादर ऑफ इंडिया(भारताचे पिता) असं संबोधलं होतं.
नवी दिल्लीः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फादर ऑफ इंडिया(भारताचे पिता) असं संबोधलं होतं. त्याच विधानावर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी आक्षेप घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प स्वतःला सुद्धा जॉर्ज वॉशिंग्टन असल्याचं सांगणार आहेत काय?, असा सवाल उपस्थित करत तुषार गांधींनी ट्रम्प यांच्यावर टीका केली. अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचं तोंडभरून कौतुक केलं होतं. ट्रम्प यांनी त्यांना 'फादर ऑफ इंडिया' म्हटलं होतं. त्यांनी मोदींची तुलना अमेरिकन गायक आणि अभिनेते एल्विस प्रेस्लीसोबत केली होती. मोदी भारतात एल्विस प्रेस्लीसारखे लोकप्रिय आहेत. हाऊडी मोदी कार्यक्रमात मोदींनी दहशतवादाबद्दल घेतलेल्या भूमिकेचीही ट्रम्प यांनी प्रशंसा केली.
दहशतवादाबद्दलची मोदींची भूमिका अतिशय कठोर होती आणि त्यांनी ती अतिशय स्पष्टपणे मांडली, असं ट्रम्प म्हणाले होते. ट्रम्प यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना तुषार गांधी म्हणाले, ज्या लोकांना नवा फादर ऑफ नेशन हवा आहे, त्यांचं स्वागत आहे. ट्रम्प यांना जॉर्ज वॉशिंग्टन (संयुक्त राज्य अमेरिकेच्या संस्थापकांपैकी एक) यांची जागा घ्यायची असल्यास त्यांनी खुशाल घ्यावी. 59 वर्षीय तुषार गांधी हे पत्रकार अरुण गांधी यांचे पुत्र, मणिलाल गांधी यांचे नातू आणि महात्मा गांधी यांचे पणतू आहेत. तुषार गांधींनी सरकारकडून महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या तयारीच्या देखाव्यावरही टीका केली आहे.
गोडसेवर तुषार गांधी म्हणाले...
जे लोक घृणा आणि हिंसेची प्रशंसा करतात त्यांना गोडसे प्रिय आहे. त्यांच्याबद्दल माझी काहीही तक्रार नाही. त्यांचा तो अधिकारी आहे आणि बापूंची पूजा करण्याचा मला अधिकार आहे. मी त्यांचं स्वागत करतो. तसेच बापूंचा सांकेतिक उत्सव हे वेदनादायक आहे. सरकारकडून महात्मा गांधींची 150वी जयंती साजरा करण्याची योजना फक्त दिखावा आहे. बापूंचे विचार आणि विचारधारा प्रत्येक ठिकाणी लागू झाले पाहिजेत. जीवन आणि प्रशासन हे एकसमानच आहे. परंतु असं होतं नसल्याचंच दुःख आहे. तुषार गांधी म्हणाले, बापूंना फक्त काही संकेतांपर्यंतच मर्यादित ठेवण्यात आले आहे. जसे की, चलनातली नोट आणि स्वच्छ भारत अभियानाच्या पोस्टरवरच फक्त बापूंना जागा देण्यात आली आहे. महात्मा गांधींची विचारधारा ही वेळेच्या पलिकडची आहे. जगभरात या विचारधारेचा आदर केला जातो.