गांधी हत्या गोडसेकडूनच; अन्य गूढ कोणीही नव्हते! सुप्रीम कोर्टात अहवाल, चौथ्या गोळीची शक्यता फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 05:56 AM2018-01-09T05:56:45+5:302018-01-09T12:01:21+5:30
महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे यानेच केल्याचे सबळ पुराव्यांनी निर्विवाद सिद्ध झाले आहे. राष्ट्रपित्याच्या हत्येच्या या कटात अन्य कोणी गूढ खुनी सामील होता व त्याने झाडलेल्या चौथ्या गोळीने गांधीजींचे प्राणोत्क्रमण झाले, असा संशय घेण्यास बिलकूल जागा नाही.
नवी दिल्ली : महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे यानेच केल्याचे सबळ पुराव्यांनी निर्विवाद सिद्ध झाले आहे. राष्ट्रपित्याच्या हत्येच्या या कटात अन्य कोणी गूढ खुनी सामील होता व त्याने झाडलेल्या चौथ्या गोळीने गांधीजींचे प्राणोत्क्रमण झाले, असा संशय घेण्यास बिलकूल जागा नाही, असा नि:संदिग्ध अहवाल माजी सॉलिसिटर जनरल व ज्येष्ठ वकील अमरेंद्र शरण यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केला.
ब्रिटिशांनी रचलेल्या कारस्थानामुळे गांधीजींची हत्या झाली. त्यातील खरा खुनी न्यायालयापुढे आणून या कटावर पांघरुण घातले गेले, असा आरोप करणारी आणि या प्रकरणाचा तपास नव्या आयोगामार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका ‘अभिनव भारत’चे संस्थापक पंकज फडणीस यांनी केली आहे.
पंकज फडणीस हे कट्टर सावरकरवादी आहेत. गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने फडणीस यांच्या या दाव्याच्या अनुषंगाने सर्व उपलब्ध तथ्ये व सामग्रीचा अभ्यास करण्यासाठी माजी सॉलिसिटर जनरल व ज्येष्ठ वकील अमरेंद्र शरण
यांची ‘अॅमायकेस क्युरी’ म्हणून
नेमणूक केली होती. त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील दोन ज्येष्ठ वकिलांच्या मदतीने महात्मा गांधी यांच्या हत्येशी संबंधित सर्व कागदपत्रांचा तपास करून अहवाल आज सादर केला.
दोन वकिलांच्या मदतीने तपासला संपूर्ण रेकॉर्ड
अॅड. संचित गुरू व अॅड. समर्थ खन्ना यांच्या मदतीने शरण यांनी गांधी खून खटल्याचे सर्व रेकॉर्ड तसेच सरकारने सन १९६९ मध्ये नेमलेल्या जीवनलाल खन्ना चौकशी आयोगाचा अहवाल यासह चार हजारांहून अधिक दस्तावेजांचा अभ्यास करून हा अहवाल सादर केला.
आधीचा खटला व चौकशीतील निष्कर्षांविषयी संशय घेण्यास कोणताही आधार नसल्याने नव्याने तपास करण्याची बिलकूल गरज नाही, असे शरण यांनी न्यायालयास कळविले. आता फडणीस यांच्या याचिकेचे काय करायचे याचा निर्णय १२ जानेवारीस अपेक्षित आहे.
सर्व बाबी नि:संशय
गांधीजींच्या शरीरात घुसलेल्या गोळ्या, त्या ज्यातून झाडल्या गेल्या ते पिस्तूल, ते ज्याने चालविले तो खुनी व ज्यातून ही हत्या झाली ती विचारसरणी या सर्वांची विधिसंमत मार्गाने पूर्ण ओळख पटलेली आहे.
त्यामुळे अंतिमत: ज्यांना खुनी म्हणून दोषी ठरविले गेले, त्यांच्याखेरीज अन्य कोणी ही हत्या केली असण्याची शक्यता दिसत नाही, असेही या अहवालात म्हटले गेले.
मुंबई हायकोर्टाने फेटाळला होता अर्ज
जगाला हादरवणाºया या हत्येची ७० वर्षांनंतर नव्याने चौकशी केली जावी यासाठी फडणीस यांनी आधी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. ती फेटाळल्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात आले.
गांधी हत्येचा खटला हे सत्य दडपण्याचे मोठे कारस्थान आहे, असा गंभीर आरोप करणाºया फडणीस यांचे असे म्हणणे आहे की, या हत्येने मराठी लोकांना व सावरकर यांना बदनाम केले गेले. हे किटाळ दूर करण्यासाठी नव्याने तपास करणे गरजेचे आहे.