गांधी, पटेल यांच्या स्वप्नातील भारत बनविण्यासाठी केले प्रामाणिक प्रयत्न- पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 07:38 AM2022-05-29T07:38:34+5:302022-05-29T07:38:47+5:30
गुजरातमध्ये २०० बेडच्या हॉस्पिटलचे उद्घाटन
राजकोट : ‘आमच्या सरकारने गत आठ वर्षांत महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्वप्नातील भारत बनविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. या काळात सरकारने नेहमीच गरिबांच्या आत्मसन्मानाचे संरक्षण केले,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान म्हणून २६ मे रोजी ८ वर्षे पूर्ण करणाऱ्या मोदी यांनी गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात अटकोट येथे शनिवारी २०० बेडच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी एका सभेला संबोधित केले. मोदी म्हणाले की, या आठ वर्षांत आपण असे कोणतेही काम केले नाही, ज्यामुळे लोकांची मान खाली जाईल.
महात्मा गांधी यांना असा भारत हवा होता ज्यात गरीब, दलित, आदिवासी आणि महिला सशक्त असतील. जिथे स्वच्छता आणि आरोग्य हे जीवनाचा अविभाज्य भाग असेल. अर्थव्यवस्थेला स्वदेशीचा आधार असेल. कोरोनाच्या काळात सरकारने गरिबांसाठी अन्नाचे भांडार खुले केले. ते म्हणाले की, ‘डबल इंजिन सरकारने गुजरातचा वेगाने विकास केला आहे.’ (वृत्तसंस्था)
आठ वर्षांत तीन कोटी घरे
मोदी म्हणाले की, गत आठ वर्षांत तीन कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना पक्की घरे दिली आहेत. १० कोटी कुटुंबांना शौचालय उपलब्ध करून दिले, तर नऊ कोटी महिलांना एलपीजी कनेक्शन देऊन चुलीच्या धुरापासून वाचविले आहे. २.५ कोटी कुटुंबांना वीज कनेक्शन दिले आहेत. सहा कोटी कुटुंबांना नळाच्या पाण्याचे कनेक्शन दिले. ५० कोटींपेक्षा अधिक लोकांना पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचारांसाठी संरक्षण दिले आहे.
युद्धामुळे वाढले खतांचे दर
गांधीनगर : कोरोनाची साथ आणि युक्रेनमधील युद्धामुळे खतांच्या किमतीत वाढ झाली. मात्र, देशातील शेतकऱ्यांना युरिया आणि अन्य खतांची टंचाई भासायला नको याची काळजी केंद्र सरकार घेत आहे. युरिया आयातीवर सरकार प्रति पोते ३२०० रुपयांचा भार सहन करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सहकारावरील एका परिसंवादात बोलताना ते बाेलत हाेते.