"मुली कुस्ती सोडतील, त्यांचे दु:ख मला पाहावत नाही", महावीर फोगाट यांनी व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 10:42 PM2023-06-01T22:42:03+5:302023-06-01T22:43:05+5:30
द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त महावीर फोगाट यांनी ब्रिजभूषण शरण सिंह प्रकरणावर भाष्य केले.
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याशी संबंधित लैंगिक शोषण प्रकरणात फोगाट बहिणींचे वडील महावीर फोगाट यांचे मोठे विधान समोर आले आहे. आपल्या मुलींची अशी अवस्था आपल्याला पाहावत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, मुली आता कुस्ती सोडतील, असा दावाही त्यांनी केला.
द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त महावीर फोगाट यांनी ब्रिजभूषण शरण सिंह प्रकरणावर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, "मला मुलींची ही अवस्था पाहावत नाही. सर्वस्व पणाला लावून मी माझ्या मुलींना पदक मिळवून देण्याच्या लायकीचे बनवले होते. आज मला हे सर्व बघता येत नाही." दरम्यान, महावीर फोगट यांच्या बलाली गावात गुरुवारी ग्रामपंचायतीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महावीर फोगाट यांनी पंचांशी चर्चा केली. यानंतर महावीर फोगाट म्हणाले, "आपल्या देशातील जनता इंग्रजांप्रमाणे सरकारला जबरदस्तीने हटवेल. या प्रश्नावर संपूर्ण देश एकजुटीने निर्णायक आंदोलन उभारणार आहे. खाप पंचायतीसह सामाजिक संस्था, शेतकरी संघटना आणि देशभरातील लोक या आंदोलनाचे साक्षीदार असतील."
दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेवर कुस्तीपटू ठाम आहेत. गेल्या मंगळवारी साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटू आपल्या पदकांचे विसर्जन करण्यासाठी समर्थकांसह हरिद्वार येथे पोहोचले होते. मात्र, शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी कुस्तीपटूंना वाटेत अडवून समज दिली. यानंतर कुस्तीपटूंनी आपले पदक नरेश टिकैत यांच्याकडे सुपूर्द केले.
या सोबतच कुस्तीपटूंनी याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. याशिवाय, यापूर्वी 29 मे रोजी कुस्तीपटू संसद भवनाच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान दिल्ली पोलिसांनी सर्व कुस्तीपटूंना ताब्यात घेतले होते. तसेच, त्याचवेळी कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर आंदोलनासाठी लावलेले तंबू पोलिसांनी हटवले होते.