मेहबुबा मुफ्ती यांचा आज शपथविधी
By admin | Published: April 4, 2016 02:44 AM2016-04-04T02:44:47+5:302016-04-04T02:44:47+5:30
पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती या आज सोमवारी जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ ग्रहण करणार आहेत.
जम्मू : पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती या आज सोमवारी जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ ग्रहण करणार आहेत. मुस्लिमबहुल जम्मू-काश्मिरात भाजपसोबत आघाडी सरकारचे नेतृत्व करणार असलेल्या मेहबुबा या देशातील दुसऱ्या मुस्लिम महिला मुख्यमंत्री असतील.
राज्यपाल एन.एन. व्होरा हे ५६ वर्षीय मेहबुबा मुफ्ती आणि त्यांच्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. मेहबुबा यांच्यासोबत आघाडीचे १६ कॅबिनेट आणि ८ राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. त्यातील भाजपच्या दोन मंत्र्यांना स्वतंत्र प्रभार देण्यात येईल. याआधी मुफ्ती मोहंमद सईद यांच्या मंत्रिमंडळात राहिलेले पीडीपीचे सर्व मंत्री मेहबुबा यांच्याही मंत्रिमंडळात कायम राहणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. भाजपने मात्र माजी राज्यमंत्री पवनकुमार गुप्ता यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान न देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यांच्या जागी नवा चेहरा दिसेल.
मेहबुबा मुफ्ती यांचे रविवारी दुपारी आपल्या कुटुंबियांसमवेत जम्मूत आगमन झाले. मेहबुबा या देशातील दुसऱ्या महिला मुस्लिम मुख्यमंत्री बनणार आहेत. याआधी ६ डिसेंबर १९८० रोजी सईदा अन्वरा तायमूर यांना देशातील पहिल्या मुस्लिम मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला होता. त्या ३० जून १९८१ पर्यंत आसामच्या मुख्यमंत्रिपदी होत्या. राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी शनिवारी मेहबुबा मुफ्ती यांना राज्यात पीडीपी-भाजप आघाडी सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण दिले होते.