MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीने 38 कोटी रुपये भरला कर, जाणून घ्या वार्षिक कमाई किती?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 05:31 AM2022-04-02T05:31:47+5:302022-04-02T05:32:52+5:30
३८ कोटी रुपये आयकर भरला
नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी मार्केटमध्ये त्याचा दबदबा अद्याप कायम आहे. या वर्षी त्याने ३८ कोटी रुपये आयकर भरला. वर्षभरात धोनीच्या उत्पन्नात ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. आयकर विभागात दाखल करण्यात आलेल्या ॲडव्हान्स टॅक्सवरून वस्तुस्थिती पुढे आली आहे. धोनीने २०२१-२२ साठी आयकर विभागाला ॲडव्हान्स टॅक्स म्हणून ३८ कोटी रुपये दिले आहेत. २०२०-२१ ला ही रक्कम ३० कोटीच्या जवळ होती.
आयकर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी या वर्षीदेखील झारखंडमधील सर्वाधिक कर देणारा वैयक्तिक करदाता ठरला आहे. धोनीने जमा केलेल्या ३८ कोटी कराच्या आधारे वर्ष २०२१-२२ मध्ये त्याचे उत्पन्न १३० कोटींच्या आसपास असण्याची शक्यता आहे. आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार धोनीने जेव्हापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली तेव्हापासून तो झारखंडमधील सर्वाधिक कर देणाऱ्या यादीत आघाडीवर असतो.
धोनीने २०१९-२० मध्ये २८ कोटी, २०१८-१९ मध्येदेखील जवळजवळ तितकीच रक्कम कर म्हणून दिली होती. त्याच्या आधी २०१७-१८ मध्ये धोनीने १२.१७ कोटी, २०१६-१७ मध्ये १०.९३ कोटी आयकर दिला होता. क्रिकेटपटू म्हणून तो फक्त आयपीएलमध्ये खेळत आहे. धोनीने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. यात स्पोर्ट्स वेअर, होम इंटिरियर, होमलोन, जुन्या गाड्यांची खरेदी विक्री कार्स २४, खाताबुक, रन एडम, क्रिकेट कोचिंग आणि ऑर्गेनिक फार्मिंग यांचा समावेश आहे. रांचीत ४३ एकर जमिनीवर तो ऑर्गेनिक शेती करतो.
धोनी- गंभीर भेटीवर चाहते खूश..
गुरुवारी झालेल्या सीएसके- लखनऊ लढतीनंतर लखनऊ संघाचे मेंटर गौतम गंभीर आणि सीएसकेचा अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी एकत्र चर्चा करताना दिसले. दोघांमध्ये चर्चा रंगताना पाहून चाहते आनंदी झाले. अलीकडे गंभीर हा धोनीवर सतत टीका करीत असतो. सामना संपल्यानंतर गंभीरने धोनीबाबत एक पोस्ट शेअर केली. त्यात कॅप्शन लिहिले, ‘कर्णधारासोबतची भेट अविस्मरणीय ठरली.’