महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत होतेय वाढ; आनंद महिंद्रांनी दिला सल्ला, म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 12:03 PM2021-03-17T12:03:28+5:302021-03-17T12:07:06+5:30
Anand Mahindra : सातत्यानं लॉकडाऊन लावत गेलो तर त्याचे मोठे परिणाम भोगावे लागतील असंही महिंद्रांनी म्हटलं आहे.
भारतातील दिग्गज उद्योजक आणि महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख (Mahindra and Mahindra) आनंद महिंद्रा यांनी महाराष्ट्र सरकारकडे एक मागणी केली आहे. राज्यात गरजेनुसार लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
"देशात अर्ध्यापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. हे राज्य देश आणि आर्थिक घडामोडींचं केंद्र आहे. सारखं सारखं लॉकडाऊन लावल्यानं आर्थिक स्थिती अधिक खालावेल. यावेळी करोना लसीच्या आपात्कालिन वापराची गरज आहे. जेणेकरून हे संक्रमण कमीतकमी लोकांमध्ये पसरेल," असं महिंद्रा म्हणाले.
I agree. But if we don’t speed up the vaccination rate we will suffer second, third and fourth waves. https://t.co/sQMYgqEJhz
— anand mahindra (@anandmahindra) March 15, 2021
पंतप्रधान कार्यालय, आरोग्यमंत्र्यांना केलं टॅग
आनंद महिंद्रा यांनी आपलं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यालय आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनादेखील टॅग केलं आहे. यानंतर त्यांनी आणखी एक ट्वीट केलं. "कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. अशातच लसीकरण अधिक वेगानं करण्याची गरज आहे. जर आपण हे केलं नाही, तर आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेचाही सामना करावा लागू शकतो," असं त्यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आनंद महिंद्रांच्या या ट्वीटला अनेकांनी प्रतिसाद दिला आहे. तसंच त्यांचं म्हणणं योग्य असल्याचं म्हणत अनेकांनी पाठइंबाही दिला आहे. काही जणांनी कोरोनाचे वाढते रुग्ण नक्कीच चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं. परंतु आपल्याला एकत्र राहून कोरोनावर विजय मिळवावा लागेल असं एका युझरनं म्हटलं.