छत्तीसगडमधील भाजपा सरकारची मोठी खेळी, महिलांच्या खात्यावर दरमहा पाठवणार हजार रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 01:34 PM2024-02-04T13:34:07+5:302024-02-04T13:39:27+5:30
भाजपा सरकारने राज्यात महतारी वंदन योजना लागू करण्याची घोषणा केली आहे.
रायपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडच्या विष्णुदेव साय सरकारने मोठी खेळी केली आहे. भाजपा सरकारने राज्यात महतारी वंदन योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. १ मार्चपासून राज्यात ही योजना लागू होणार आहे. महतारी वंदन योजनेंतर्गत राज्यातील विवाहित, घटस्फोटित आणि विधवा महिलांना लाभ मिळणार आहे. यामध्ये सरकार दरवर्षी महिलांच्या खात्यात १२ हजार रुपये जमा करणार आहे.
दरवर्षी १२ हजार रुपये
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाने महिलांच्या खात्यात दरवर्षी १२ हजार रुपये पाठवण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत सरकारने ही योजना जाहीर केली आहे. महतारी वंदन योजनेअंतर्गत, दरमहा एक हजार रुपये म्हणजेच १२ हजार रुपये DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे महिलांच्या बँक खात्यात पाठवले जातील.
या महिला असतील पात्र
महतारी योजनेसाठी अर्ज करणारी महिला मूळची छत्तीसगडची असली पाहिजे. यासोबतच महिला अर्जदाराचे वय १ जानेवारी २०२४ रोजी २१ वर्षे असावे. विवाहित महिलांव्यतिरिक्त, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता महिला देखील योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. दरम्यान, या योजनेसाठी आयकर भरणारी महिला पात्र नसणार आहे.
कसा करावा अर्ज?
छत्तीसगड सरकारची महतारी वंदन योजना मार्चपासून सुरू होणार आहे. त्यासाठी अर्ज भरावे लागणार आहेत. या योजनेचा लाभ देण्यासाठी सरकार लवकरच ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करणार आहे. ऑनलाइन प्रक्रियेत, एखाद्याला महतारी वंदन योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि ऑनलाइन फॉर्म सबमिट करावा लागेल. तर ऑफलाईन प्रक्रियेत महिला महतारी वंदना योजनेशी संबंधित कार्यालयात जाऊन अर्ज सादर करू शकतील.