५ नोव्हेंबरपर्यंत मोईत्रा यांच्याकडे नाही वेळ; आचार समितीपुढे हजर झाल्या नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 09:16 AM2023-10-28T09:16:24+5:302023-10-28T09:17:05+5:30
त्यांनी हजर राहण्यासाठी समितीकडे आणखी वेळ मागितला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभेच्या आचार समितीने तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या प्रकरणात समन्स बजावून ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता समितीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्यांनी हजर राहण्यासाठी समितीकडे आणखी वेळ मागितला आहे.
मोईत्रा यांनी समितीचे अध्यक्ष विनोद कुमार सोनकर यांना पत्र लिहून त्या ३१ ऑक्टोबर रोजी आधीच्या व्यस्ततेमुळे आरोपांच्या चौकशीसंदर्भात उपस्थित राहू शकत नाहीत आणि ५ नोव्हेंबरनंतरच उपलब्ध होतील, असे सांगितले आहे.
तत्पूर्वी मोईत्रा यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये समितीसमोर स्वत: उपस्थित राहण्यास आणि निंदनीय आरोपांविरुद्ध आपला बचाव
सादर करण्यास आपण उत्सुक आहोत, परंतु पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या दुर्गापूजेच्या उत्सवामुळे ४ नोव्हेंबरपर्यंत व्यस्त असल्याचे कारण दिले. आता समिती यावर काय निर्णय घेते, त्यांना आधीच बोलावले जाईल की वेळ दिला जाईल याकडे लक्ष लागले आहे.
पाच वर्षांत किती परदेश दौरे केले?
नैतिकता समितीने गुरूवारी दुपारी सुमारे ३ तास बैठक घेतली होती. त्यात समितीने आयकर विभाग आणि गृह मंत्रालयाला पत्र लिहून महुआ मोईत्रा प्रकरणाशी संबंधित माहिती मागविली. समितीने गृह मंत्रालयाकडून मोईत्रा यांच्या गेल्या ५ वर्षांतील परदेश दौऱ्यांचा तपशील मागविला आहे. त्या देशाबाहेर कुठे गेल्या आणि त्यांनी याबाबत लोकसभेला माहिती दिली की नाही, याची चौकशी समिती करेल. यानंतर त्यांचे लॉग इन त्यांच्या खासदारकीच्या आयडीवर जुळवून पाहिले जाईल. मोईत्रांशी संबंधित वादात आयटी मंत्रालयाकडून आधीच माहिती मागविण्यात आली आहे.