Mahua Moitra : महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द, आता संसदेत परतण्यासाठी कोणते पर्याय उरले? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 09:46 AM2023-12-09T09:46:20+5:302023-12-09T09:47:24+5:30
Mahua Moitra : खासदारकी रद्द झाल्यानंतर महुआ मोईत्रा यांच्यापुढे कोणते पर्याय उरले आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिकांकडून पैसे घेतल्याबद्दल संसदीय नैतिकता समितीने त्यांना दोषी ठरविल्यानंतर लोकसभेने त्यांची खासदारकी रद्द केली. समितीने मोईत्रा यांचे वर्तन अशोभनीय आणि अनैतिक असल्याचा ठपका ठेवला आहे.
काय आहेत आरोप?
महुआ मोईत्रा यांनी लोकसभेच्या सदस्य पोर्टलचा युजर आयडी आणि पासवर्ड अनधिकृत व्यक्तीसोबत शेअर करून सभागृहाचा अवमान केला; एवढेच नाहीतर, राष्ट्रीय सुरक्षाही धोक्यात आणली, असा ठपकाही अहवालात ठेवण्यात आला आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी या प्रकरणाची तक्रार केली होती, त्यानंतर नैतिकता समितीने चौकशी सुरू केली होती.
काय म्हणाल्या महुआ मोईत्रा?
खासदारकी रद्द केल्यानंतर महुआ मोईत्रा म्हणाल्या, आपल्याला हाकलून देण्याचा निर्णय 'कंगारू कोर्टा'द्वारे दिलेल्या फाशीच्या शिक्षेसारखा आहे. विरोधकांना झुकण्यास भाग पाडण्यासाठी सरकारकडून संसदीय समितीचा शस्त्र म्हणून वापर केला जात आहे, आपण अस्तित्वात नसलेल्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दोषी आढळलो आहोत आणि रोख किंवा भेटवस्तू दिल्याचा कोणताही पुरावा नाही.
पाच पर्याय कोणते?
अशा स्थितीत खासदारकी रद्द झाल्यानंतर महुआ मोईत्रा यांच्यापुढे कोणते पर्याय उरले आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महुआ मोईत्रा यांच्याकडे एकूण पाच पर्याय शिल्लक आहेत. मात्र, त्यांनी हे पर्याय वापरल्यास दिलासा मिळेल, असे आत्ताच स्पष्टपणे सांगता येणार नाही. तर पाच पर्यायांबद्दल जाणून घेऊया....
१) महुआ मोईत्रा यांच्याकडे पहिला पर्याय म्हणजे संसदेला या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याची विनंती करणे. मात्र, त्याचा विचार करायचा की नाही, याचा अंतिम निर्णय संसदेचा असेल.
२) महुआ मोईत्रा यांच्याकडे मूलभूत हक्क आणि न्यायाचे उल्लंघन झाल्याचे कारण देत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा दुसरा पर्याय आहे. त्यांनी याप्रकरणी केस करावी आणि त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाची अपेक्षा करावी.
३) संसदेचा निर्णय मान्य करून पुढे जाण्याचा तिसरा पर्याय महुआ मोईत्रा यांच्याकडे आहे. तब्बल चार महिन्यांनी पुन्हा एकदा निवडणुका होणार आहेत. त्यांनी निवडणूक लढवावी आणि जिंकल्यानंतर त्यांनी पुन्हा संसदेत प्रवेश करावा.
४) महुआ मोईत्रा यांची इच्छा असल्यास त्या चौथा पर्याय म्हणून नैतिकता समितीच्या अधिकारक्षेत्राला आव्हान देऊ शकतात. त्या असा युक्तिवाद करू शकतात की नैतिकता समितीने आपल्या विरुद्ध निर्णय देताना पक्षपातीपणा केला होता. तसेच, या प्रकरणाची विशेषाधिकार समितीने पाहणी करावी, असेही त्या म्हणू शकतात.
५) पाचवा पर्याय म्हणून महुआ मोईत्रा दिल्ली उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातून दिलासा मागू शकते. यासाठी त्यांना न्यायालयात सिद्ध करावे लागेल की, त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे त्यांची प्रतिमा डागाळली आहे. याद्वारे ती आचार समितीचा निर्णय बदलण्याची आशा करू शकतात.