महुआ मोइत्रांना दिलासा नाहीच! सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख; आता सुनावणी कधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 06:02 PM2023-12-15T18:02:56+5:302023-12-15T18:06:03+5:30
Mahua Moitra Supreme Court Case: खासदारकी रद्द प्रकरणी महुआ मोइत्रा यांनी तत्काळ सुनावणी घेण्याची विनंती सुप्रीम कोर्टाला केली होती.
Mahua Moitra Supreme Court Case: कॅश फॉर क्वेरी प्रकरणात नैतिकता समितीच्या शिफारसी स्वीकारून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली. लोकसभेच्या या निर्णयाविरोधात महुआ मोइत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती महुआ मोइत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे.
महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिकांकडून पैसे घेतल्याबद्दल संसदीय नैतिकता समितीने त्यांना दोषी ठरविल्यानंतर लोकसभेने त्यांची गेल्या शुक्रवारी खासदारकी रद्द केली होती. यावेळी नैतिकता समितीने महुआ मोईत्रा यांचे वर्तन अशोभनीय आणि अनैतिक असल्याचा ठपका ठेवला होता. यानंतर महुआ मोइत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने दिली पुढची तारीख; आता सुनावणी कधी?
सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी सुरू होताच न्या. संजीव खन्ना आणि न्या. एसव्हीएन भट्टी यांच्या खंडपीठाने महुआ मोईत्रा यांच्या वतीने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांना सांगितले की, या प्रकरणाची कागदपत्रे पाहिली नाही. खंडपीठाला हिवाळी सुट्ट्यांनंतर सुनावणी करायची आहे. मला या प्रकरणाची फाइल सकाळीच मिळाली, ती पाहण्यासाठी वेळ मिळाला नाही. मला यात लक्ष घालायचे आहे. त्यामुळे ३ किंवा ४ तारखेला सुनावणी घेऊ शकतो का, असा प्रश्न न्या. संजीव खन्ना यांनी अभिषेक मनु सिंघवी यांना केला. यानंतर या याचिकेवर ३ जानेवारी रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, महुआ मोइत्रा यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. आपल्याला हाकलून देण्याचा निर्णय फाशीच्या शिक्षेसारखा आहे. विरोधकांना झुकण्यास भाग पाडण्यासाठी सरकारकडून संसदीय समितीचा शस्त्र म्हणून वापर केला जात आहे. अस्तित्वात नसलेल्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दोषी धरण्यात आले आहे. रोख किंवा भेटवस्तू दिल्याचा कोणताही पुरावा नाही, अशी आक्रमक प्रतिक्रिया महुआ मोइत्रा यांनी खासदारकी रद्द केल्यानंतर केली होती.