मोइत्रांचे व्यवहार अनैतिक, त्यांची खासदारकी रद्द करा; नैतिकता समितीच्या बैठकीत प्रस्ताव ६-४ मतांनी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 07:13 IST2023-11-10T05:54:16+5:302023-11-10T07:13:49+5:30
नैतिकता समितीच्या बैठकीत महुआ मोइत्रा यांचे व्यवहार व आचरण अनैतिक मानण्यात येऊन त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करण्यात आली.

मोइत्रांचे व्यवहार अनैतिक, त्यांची खासदारकी रद्द करा; नैतिकता समितीच्या बैठकीत प्रस्ताव ६-४ मतांनी मंजूर
- संजय शर्मा
नवी दिल्ली : पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खा. महुआ मोइत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे. नैतिकता समितीच्या गुरुवारच्या बैठकीत महुआ मोइत्रा यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या अहवालाचा प्रस्ताव ६-४ मतांनी मंजूर करण्यात आला. हा अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे आज सुपूर्द केला जाणार आहे.
नैतिकता समितीच्या बैठकीत महुआ मोइत्रा यांचे व्यवहार व आचरण अनैतिक मानण्यात येऊन त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करण्यात आली. ५०० पानांच्या या अहवालात समितीने महुआ मोइत्रा यांच्या विरोधात कठोर शिक्षा देण्याची शिफारस केली आहे. हा अहवाल समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत.
आरोप सिद्ध होण्याआधीच...
तृणमूलने आपल्या पक्षाच्या खासदार महुआ मोइत्रा यांचे समर्थन करत म्हटले आहे की, त्यांना केंद्राकडून त्रास दिला जात आहे. मोइत्रा यांच्या विरोधात आरोप सिद्ध होण्याआधीच संसदेची एखादी समिती त्यांच्यावर कशी काय कारवाई करू शकते?
मोइत्रांची चूक काय?
नैतिकता समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर म्हणाले की, खा. महुआ मोइत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द होऊ शकते. त्यांना संसद सदस्य म्हणून अपात्र ठरवले जाऊ शकते, कारण हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. येथे केवळ पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा मुद्दा नाही, तर संसदेचे लॉग इन, आयडी एखाद्या व्यावसायिकाला विदेशात देण्यात आले. याचा दुरुपयोगही झाला असता.
कांगारू कोर्टाने दिलेला हा पूर्वनियोजित निकाल आहे. भारतीय लोकशाहीचा मृत्यू झाल्याचे हे निदर्शक आहे. विद्यमान लोकसभेतून माझी हकालपट्टी केली तरी मी पुढील लोकसभेत मोठ्या मताधिक्याने परतेन. मात्र, मी यामुळे गप्प राहणार नाही. आधी माझी हकालपट्टी होऊ द्या, मग मी पुढचे पाऊल उचलणार आहे.
-महुआ मोइत्रा, खासदार