महुआ मोईत्रा यांचे संसदीय खाते दुबईतून ४७ वेळा झाले लॉगइन; उद्या होणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 07:48 PM2023-11-01T19:48:08+5:302023-11-01T19:49:33+5:30
महुआ मोईत्रा यांना उद्या या कमिटीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी एका व्यावसायिकाकडून लाच घेतल्याचा आरोप केला होता. महुआ मोइत्रा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली होती. यानंतर ओम बिर्ला यांनी हे प्रकरण संसदेच्या एथिक्स कमिटीकडे पाठवले होते.
महुआ मोईत्रा यांना उद्या या कमिटीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र याआधी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. दुबईतील एका सुप्रसिद्ध व्यावसायिक घराण्याचे वंशज, व्यापारी दर्शन हिरानंदी यांच्या सांगण्यावरून मोईत्रा यांनी प्रश्न विचारल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच दुबईतून महुआ मोईत्रा यांचे संसदीय खाते तब्बल ४७ वेळा लॉग इन झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उद्या संसदेच्या एथिक्स कमिटीच्या चौकशीत काय समोर येणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सदर आरोपांवर उत्तर देताना महुआ मोईत्रा यांनी सांगितलं की, 'कॅश फॉर क्वेरी'चं हे प्रकरण फसल्यानंतर आता हे राष्ट्रीय सुरक्षा प्रकरण म्हणून समोर आणलं जात आहे. मी लोकसभेचा आपला लॉग-इन आयडी एका विदेशी संस्थेला दिल्याचा भाजपाचा दावा आहे. दर्शन माझा मित्र आहे आणि त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे. त्याने दुबईवरुन लॉग-इन केलं असंही भाजपाचं म्हणणं आहे. मी स्वत: स्वित्झर्लंडवरुन लॉगइन केलं आहे. त्यातही जर एवढी चिंता असेल तर मग आयपी अॅड्रेसवर निर्बंध का लावत नाही?, असा सवाल महुआ मोईत्रा यांनी उपस्थित केला आहे.
नेमकं काय प्रकरण आहे?
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी एका व्यावसायिकाकडून लाच घेतल्याचा आरोप केला होता. महुआ मोइत्रा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली होती. यानंतर ओम बिर्ला यांनी हे प्रकरण संसदेच्या एथिक्स कमिटीकडे पाठवले होते. जय अनंत देहाद्राई यांच्याकडून मिळालेल्या पत्राचा हवाला देत निशिकांत यांनी मोईत्रा यांच्यावर हे आरोप केले आहेत.
निशिकांत दुबे यांचा दावा आहे की, महुआ मोइत्रा यांनी नुकत्याच लोकसभेत विचारलेल्या ६१ प्रश्नांपैकी ५० प्रश्न अदानी प्रकरणावर केंद्रित होते. त्याचवेळी मोईत्रा यांनी या संपूर्ण वादासाठी निशिकांत दुबे आणि त्यांचा मित्र जय अनंत यांना जबाबदार धरले. १७ ऑक्टोबर रोजी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आरोप केले की, त्यांच्या प्रतिमेला हानी पोहोचवण्यासाठी हे आरोप करण्यात आले आहेत. महुआ मोइत्रा यांच्या याचिकेत न्यायालयाने दुबे, देहाद्राई आणि अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मीडिया हाऊसना त्यांच्या विरोधात कोणतीही खोटी आणि बदनामीकारक माहिती पोस्ट, प्रसारित करण्यापासून रोखण्यासाठी निर्देश जारी करावेत अशी मागणी केली आहे. मात्र महुआ यांच्या वकिलांनी या खटल्यातून माघार घेतली.