ट्रोलनंतर मेल, एक्स्प्रेसमध्ये ‘मसाज’चा प्रस्ताव मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 04:16 AM2019-06-16T04:16:23+5:302019-06-16T04:16:57+5:30
मसाजची सुविधा पुरविणे अशोभनीय असल्याने, या विरोधात महिला संघटनांनी विरोध दर्शविला. परिणामी, पश्चिम रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेसमधील मसाजसेवेचा प्रस्ताव रद्द केला.
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागाने महसूलवाढीसाठी ‘मसाज’ सुविधा मेल, एक्स्प्रेसमध्ये सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डात दिला होता. मात्र, या सेवेला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. मसाजची सुविधा पुरविणे अशोभनीय असल्याने, या विरोधात महिला संघटनांनी विरोध दर्शविला. परिणामी, पश्चिम रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेसमधील मसाजसेवेचा प्रस्ताव रद्द केला.
रतलाम विभागामधील इंदूर स्थानकातून सुटणाऱ्या ३९ मेल, एक्स्प्रेसमध्ये मसाज सुविधा अंमलात आणण्याचा प्रस्ताव होता. यामध्ये डेहराडून-इंदूर एक्स्प्रेस, नवी दिल्ली-इंदूर इंटरसिटी एक्स्प्रेस आणि अमृतसर एक्स्प्रेस या रेल्वेमध्ये मसाजची सुविधा पुरविण्यात येणार होती.
याद्वारे २० लाख रुपये आणि मसाजसेवा पुरविणाºया व्यक्तींच्या तिकिटांद्वारे ९० लाख रुपयांचा अतिरिक्त महमूल मिळण्याचा उद्देश होता. मात्र, ही माहिती सोशल मीडियावरून प्रसारित झाल्यानंतर युजर्सनी भारतीय रेल्वे, पश्चिम रेल्वे प्रशासनाला ट्रोल केले. मसाजसेवेच्या प्रस्तावाच्या विरोधात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी अनेकांनी पत्रव्यवहार केला.
प्रवाशांच्या सूचनेप्रमाणे मसाजसेवेचा निर्णय रद्द केला आहे. प्रवाशांनी दिलेल्या सूचना, उपाययोजना, तक्रारी यावर काम केले जाणार आहे. पश्चिम रेल्वे प्रशासन प्रवासांना आरामदायी, सुरक्षित प्रवास अधिक चांगल्या प्रकारे देण्यास तत्पर राहील, असे पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
अशी होती सुविधा
मसाजसाठी सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत वेळ होती. प्रत्येक रेल्वेत मसाज करणाºयांसाठी पाच कर्मचारी नेमण्यात येणार होते. मसाजचे प्रकार तीन गटांत विभागले होते. गोल्डमध्ये १०० रुपयांत आॅलिव्ह तेल किंवा चिकट होत नसलेल्या तेलाने मसाज केला जाणार होता. डायमंडमध्ये २०० रुपयांत सुगंधी तेलाने आणि प्लॅटिनममध्ये ३०० रुपयांत क्रीमद्वारे मसाज केला जाणार होता.