जुनैद खान हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी धुळ्यातून अटक
By admin | Published: July 8, 2017 07:33 PM2017-07-08T19:33:56+5:302017-07-08T19:52:40+5:30
हरियाणामधील फरीदाबाद जिल्ह्यात बल्लभगड येथे जुनैद खानची जमावाने मारहाण करत हत्या केली होती
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - जुनैद खान हत्या प्रकरणी हरियाणा पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. हरियाणामधील फरीदाबाद जिल्ह्यात बल्लभगड येथे जुनैद खानची जमावाने मारहाण करत हत्या केली होती. आरोपीला धुळ्यातून अटक करण्यात आली आहे. नरेंद्र इंद्रसिंग जाटला असं या आरोपीचं नाव आहे. अल्पवयीन जुनैद खान 22 जून रोजी ट्रेनने गाजियाबादहून मथुराला जात असताना त्याच्यावर हल्ला करत मारहाण करुन हत्या करण्यात आली होती.
आणखी वाचा
"जुनैद खान हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला महाराष्ट्रातील धुळ्यामधून अटक करण्यात आली आहे", अशी माहिती जीआरपीच्या वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिली आहे. "सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतरच आरोपीची ओळख जाहीर करण्यात येईल", असंही त्यांनी सांगितलं आहे. "प्राथमिक तपासादरम्यान आरोपीने आपण जुनैद आणि त्याच्या मित्रांवर हल्ला केल्याचं कबूल केलं आहे" अशी माहिती अधिका-याने दिली आहे. आरोपीला उद्या म्हणजे 9 जुलै रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
Railway Police Haryana has arrested the main accused in #Ballabhgarh train lynching case from Maharastra"s Dhule pic.twitter.com/PufA8BLblL
— ANI (@ANI_news) July 8, 2017
याआधी रेल्वे पोलिसांनी आरोपींची माहिती देणा-या तसंच ओळख पटवणा-याला दोन लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. 22 जून रोजी दिल्लीमध्ये ईदची खरेदी केल्यानंतर जुनैद आपले चुलत भाऊ हसीम आणि शकीर मोईन यांच्यासोबत पलवाल येथील आपल्या गावी चालला होता. मारहाणीत जुनैदचे भाऊदेखील जखमी झाले होते.
जवळपास 15 ते 20 जण ओखला रेल्वे स्टेशन आल्यावर ट्रेनमध्ये चढले आणि त्यांना जागा खाली करण्यास सांगितलं. यावेळी जुनैद आणि त्याच्या भावांना जबरदस्त मारहाण करण्यात आली. हल्ला करणा-यांकडे हत्यारंही होती. सर्वांना मारहाण करुन नंतर रेल्वे स्थानकावर टाकून देण्यात आलं होतं.
दिल्लीमधील एका सरकारी कर्मचा-यासहित पाच जणांना अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य आरोपीपर्यंत पोलीस पोहोचले नव्हते. याआधी जीआरपीने 50 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
जुनैद खानच्या हत्येनंतर चित्रपट निर्माता सबा दिवान यांनी फेसबूकवर निषेधार्थ एक पोस्ट लिहिली होती. सोशल मीडियावर त्यांनी केलेली पोस्ट आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला . त्यानंतर #NotInMyName हॅशटॅगही ट्रेंडिंगमध्ये आला होता. याच नावाने देशभरात रॅलीही काढण्यात आल्या. सबा दिवान यांचं म्हणणं आहे की, "समाज आणि धर्माच्या नावे जी काही हिंसा होत आहे, त्याचा विरोध करण्यासाठी हे आंदोलन आहे. नॉट इन माय नेमचे फलक हातात घेऊन लोक आमचा या हत्यांशी काही संबंध नसून, आम्ही याचा निषेध करतो असं सांगत आहेत"".