नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 18:25 IST2024-11-22T18:23:30+5:302024-11-22T18:25:36+5:30
Maitri Patel : १९ वर्षीय मैत्री पटेलने भारतातील सर्वात तरुण महिला कमर्शियल पायलट बनून इतिहास रचला आहे.

नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
१९ वर्षीय मैत्री पटेलने भारतातील सर्वात तरुण महिला कमर्शियल पायलट बनून इतिहास रचला आहे. अमेरिकेत पायलटचं प्रशिक्षण घेतल्यानंतर तिने ही भरारी घेतली आहे. मैत्रीला अनेक अडचणी आल्या, पण तिने प्रत्येक आव्हानाचा सामना करत आपलं स्वप्न पूर्ण केलं. मैत्रीचे वडील कांतीलाल पटेल हे शेतकरी असून आई सूरत महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करते. दोघांनीही तिला नेहमीच साथ दिली. पायलट प्रशिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी कांतीलाल यांनी आपल्या कुटुंबाची काही जमीनही विकली.
वयाच्या आठव्या वर्षी पायलट आणि विमान पहिल्यांदा पाहिल्यावर मैत्रीने पायलट होण्याचं स्वप्न पाहिलं. तेव्हापासून तिच्या मनात पायलट होण्याचा दृढनिश्चय झाला. मैत्रीने मेटास ॲडव्हेंटिस्ट स्कूलमधून बारावी केली आणि त्यानंतर पायलट प्रशिक्षणासाठी अमेरिकेला गेली. अवघ्या ११ महिन्यांत, तिने १८ महिन्यांचा कमर्शियल पायलट कोर्स पूर्ण केला, यामध्ये तिची मेहनत आणि समर्पण आहे.
आपल्या अनुभवाबद्दल सांगताना मैत्री म्हणाली, मी माझं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि माझ्या वडिलांना अमेरिकेत येण्यास सांगितलं, त्यानंतर मी ३५०० फूट उंचीवरून विमान उडवलं. माझ्यासाठी हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं. मैत्रीचा प्रवास ही कठोर परिश्रम, संघर्ष आणि विश्वासाची गोष्ट आहे, कारण आर्थिक अडचणी असूनही तिने असे काही केलं जे अनेकांना अशक्य वाटतं.
मैत्रीच्या या कृतीचं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह अनेक व्यक्तींनी कौतुक केलं. त्यांनी मैत्रीच्या कार्यक्षमतेचं कौतुक केलं आणि तिला तिच्या करिअरसाठी शुभेच्छा दिल्या. आज मैत्री पटेल ही फक्त भारतातील तरुणींसाठीच प्रेरणा बनली नाहीत तर ती जगभरातील तरुणांना दाखवून देत आहेत की, कठोर परिश्रम आणि समर्पणाने कोणतंही स्वप्न साकार होऊ शकतं. आत्मविश्वास आणि मेहनत असेल तर कोणत्याही अडचणीवर मात करता येते.