देशातून झाली मक्याची सहा वर्षांतील उच्चांकी निर्यात; बांगलादेशचा हिस्सा ६६ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 12:40 AM2020-12-28T00:40:05+5:302020-12-28T00:40:18+5:30
बांगलादेशचा हिस्सा ६६ टक्के; अपेडाने जाहीर केली आकडेवारी
नवी दिल्ली : बांगलादेशकडून मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आल्यामुळे देशातील मक्याची निर्यात सहा वर्षांमधील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. एकट्या बांगलादेशने ६६ टक्के मक्याची खरेदी केल्यामुळे मक्याच्या निर्यातीला चालना मिळाली आहे.
अपेडा या निर्यातविषयक संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ९.२२ लाख टन मका निर्यात केला गेला. त्याचे मूल्य १८४.५२ दशलक्ष डॉलर राहिले. मागील वर्षाच्या याच कालावधीमध्ये ३.७०लाख टन मका (मूल्य १४२.७८ दशलक्ष डॉलर) निर्यात केला गेला होता. एप्रिल महिन्यापासून नोव्हेंबरअखेर १५.०४ लाख टन मक्याची निर्यात झाली असून, त्याचे मूल्य ३२७ दशलक्ष अमेरिकन डॉलर असल्याचे अपेडाने जाहीर केले आहे.
बांगलादेशमुळे उच्चांक
चालू आर्थिक वर्षामध्ये बांगलादेशने भारतामधून ६.१८ लाख टन मक्याची आयात केली आहे. याआधी सन २०११२-१३मध्ये झालेली ४७.८८ लाख टनांची निर्यात ही बांगलादेशला झालेली सर्वाधिक निर्यात होती. यंदा २०० ते २४० डॉलर प्रतिटन (म्हण जेच १४,७०० ते १७,६५० रुपये) या दराने मक्याची निर्यात केली गेली. चालू वर्षासाठी जाहीर केलेल्या आधार किमतीपेक्षा हा दर कमीच आहे. जुलै २० ते जून २१ या काळासाठी १८,५०० रुपये प्रतिटन हा आधारभाव जाहीर झाला आहे.