गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 03:36 PM2024-10-12T15:36:57+5:302024-10-12T16:13:52+5:30
गुजरातमध्ये भिंत कोसळून सात मजूर ठार झाल्याची धक्कादाय माहिती समोर आली आहे.
Gujarat Wall Collapsed :गुजरातमधूनअपघाताची मोठी घटना समोर आली आहे. शनिवारी गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात भिंत कोसळल्याने अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून मातीचा ढिगारा बाजूला काढण्याचे काम सुरु आहे.
मेहसाणा जिल्ह्यातील कडी तालुक्यातील जसलपूर गावाजवळील एका खासगी कंपनीमध्ये बांधकामाच्या ठिकाणी सात जणांचा मृत्यू झाला आहे.अजूनही ४ ते ५ मजूर अडकल्याची शक्यता आहे. कारखान्यासाठी भूमिगत टाकी बसविण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक माती खचल्याने त्या जागेवर काम करणारे मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. टाकी खोदणाऱ्या मजुरांवर मोठ्या प्रमाणात माती पडली आणि ते खाली अडकले गेले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकही घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. रुग्णवाहिका आणि पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आतापर्यंत मातीच्या ढिगाऱ्याखालून सात मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
#UPDATE | Gujarat: 7 people died after the wall of a private company collapsed near Jasalpur village in Kadi taluka of Mehsana district: Tarun Duggal, SP Mehsana https://t.co/EYi6c6pcHv
— ANI (@ANI) October 12, 2024
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसलपूर गावात अनेक कामगार एका कारखान्यासाठी भूमिगत टाकी खोदत असताना माती खचली. या ढिगाऱ्याखालून सात मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अजूनही तीन ते चार मजूर मातीखाली गाडले असण्याची शक्यता आहे. स्टील आयनॉक्स स्टेनलेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत झालेल्या अपघातानंतर जेसीबीच्या सहाय्याने माती काढण्यात येत आहे. कंपनीत सध्या बांधकाम सुरू आहे. कामगार टाकी खोदत असताना अचानक माती खचली.
दरम्यान, या घटनेची चौकशी सुरू असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना राबविण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, पीडितांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.