केदारनाथच्या पायी मार्गावर मोठी दुर्घटना; दगड कोसळून महाराष्ट्रातील दोन भाविकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 12:02 PM2024-07-21T12:02:25+5:302024-07-21T12:02:45+5:30
बचावकार्य सुरु करण्यात आले असून तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्राच्या दोघांचा समावेश आहे.
केदारनाथच्या पायी मारर्गावर रविवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. मार्गावर दगड-माती कोसळल्याने अनेकजण जखमी झाले आहेत. तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आठ जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमधील भाविकांचा समावेश आहे.
बचावकार्य सुरु करण्यात आले असून तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्राच्या दोघांचा समावेश आहे. चिरबासा परिसराजवळच्या मार्गावर सकाळी साडेसातच्या सुमारास डोंगरावरून ढिगारा आणि मोठमोठाले दगड खाली पडू लागले, असे रुद्रप्रयाग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले.
मृतांमध्ये किशोर पराटे (महाराष्ट्र, २१), सुनिल महादेव (महाराष्ट्र, २४) आणि अनुराग बिष्ट (उत्तराखंड, २४) यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये महाराष्ट्रातील अभिषेक चौहान (वय १८) आणि धनेश्वर दांडे (वय २७) यांचा समावेश आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शोक व्यक्त केला आहे. केदारनाथ यात्रा मार्गाजवळील टेकडीवरून ढिगारा आणि मोठमोठे दगड पडल्यामुळे काही यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. बचावकार्य सुरु आहे. जखमींना चांगले उपचार देण्याच्या सूचना केल्या आहेत, असे ते म्हणाले.