काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई, 24 तासात 10 दहशतवादी केले ठार
By admin | Published: May 27, 2017 04:42 PM2017-05-27T16:42:34+5:302017-05-27T18:45:25+5:30
गेल्या 24 तासात सर्च ऑपरेशदरम्यान भारतीय लष्कराने कारवाई करत 10 दहशतवाद्यांना ठार केलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 27 - गेल्या 24 तासात सर्च ऑपरेशदरम्यान भारतीय लष्कराने कारवाई करत 10 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. लष्कराने स्वत: ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सर्व दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि स्फोटकांचा साठा होता. विशेष म्हणजे शनिवारी सकाळीच सुरक्षा जवानांनी हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमदला ठार केलं आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे सुरक्षा पथकांबरोबर झालेल्या चकमकीत सबजार अहमद ठार झाला. सबजार अहमदने काश्मीर खो-यात बुरहान वानीची जागा घेतली होती.
पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी रमजानच्या पवित्र महिन्यात जम्मू काश्मीरात दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करत असून जवानांनी तो हाणून पाडला आहे असं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे. सबजार अहमदला ठार करण्याआधी शुक्रवारी रात्री जम्मू काश्मीरात पुलवामा येथे दहशतवाद्यांनी जवानांच्या एका पथकावर हल्ला केला होता. लष्कराने प्रत्युत्तर देत सर्च ऑपरेशनदरम्यान तीन दहशतवाद्यांना ठार केलं.
In the last 24 hours, 10 heavily armed terrorists have been successfully eliminated: Army
— ANI (@ANI_news) May 27, 2017
सबजारचा खात्मा लष्करासाठी मोठं यश असल्याचं म्हटलं जात आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 25 वर्षीय सबजार अहमद "सब डॉन"च्या नावाने प्रसिद्ध होता. गतवर्षी जुलै महिन्यात लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत हिजबुलचा म्होरक्या बुरहान वानी ठार झाल्यानंतर सबजार अहमदने त्याची जागा घेतली होती.
गतवर्षी 7 जुलै रोजी बुरहान वानी ठार झाल्यानंतर सबजारला हिजबुलचा कमांडर बनवण्यात आलं होतं. बुरहानच्या अंत्यसंस्कारालाही त्याने हजेरी लावली होती. एकदा तर स्थानिकांनी केलेल्या दगडफेकीमुळे पळून जाण्यात तो यशस्वी झाला होता.
सबजारच्या मृत्यनंतर खो-यात पुन्हा एकदा हिंसाचार वाढला आहे. अनंतनागमधील एक व्यक्ती जखमी झाला आहे. दरम्यान खो-यात इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे. याआधी शनिवारी काश्मीरमध्ये सोशल मीडिया आणि मोबाईल अॅप्सवर लावण्यात आलेली बंदी हटवण्यात आली होती.