VIDEO - BSF चा POK मध्ये मोठा हल्ला, 10 पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 01:27 PM2018-01-04T13:27:13+5:302018-01-04T17:45:22+5:30
जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात जवान शहीद झाल्यानंतर भारतीय लष्करानेही लगेचच सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात जवान शहीद झाल्यानंतर भारतीय लष्करानेही लगेचच सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या बॉर्डर अॅक्शन फोर्सने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये मोठा हल्ला केला. बीएसएफच्या कारवाईत 10 पेक्षा जास्त पाकिस्तानी रेंजर्स ठार झाले असून पाकिस्तानच्या तीन चौक्या उद्धवस्त करण्यात आल्याचे वृत्त न्यूज 18 वृत्तवाहिनीने दिले आहे.
काल सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन केलेल्या गोळीबारात बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल आरपी हजरा शहीद झाले होते. भारतीय लष्कराने 24 तासांच्या आता पाकिस्तानला जबर दणका दिला आहे. चार दिवसांपूर्वी पाकधार्जिण्या अतिरेकी कारवायांनी विदीर्ण झालेल्या काश्मीरच्या सरत्या वर्षाची सांगता रक्तपाताने झाली.
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, अतिरेक्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 5 जवान शहीद झाले, तर आणखी तिघे जखमी झाले.
Our BSF soldier was deployed on forward duty point when Pakistan's siphon shot hit him yesterday. Border Security Force gave a solid response in which Pakistan's infrastructure, solar panel & weapons were damaged. Their posts suffered major loss: Ramawtar, IG BSF Jammu pic.twitter.com/NWH1APmJN0
— ANI (@ANI) January 4, 2018
लष्कराच्या घातक कमांडोंनी POK मध्ये घुसून अशी केली कारवाई
आठवडयाभरापूर्वी भारतीय लष्कराच्या घातक कमांडोंनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या रावळकोट सेक्टरमधील रुख चकरी भागात घुसून कारवाई केली होती. पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमने केलेल्या हल्ल्यात मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह दोन जवान शहीद झाले होते. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या हेतूने ही कारवाई करण्यात आली होती. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भागात जाऊन कारवाई करणे इतके सोपे नव्हते पण घातक कमांडोंनी या मोहिमेतून आपले शौर्य, साहस आणि जिगर जगाला दाखवून दिली.
अशी केली कारवाई
सर्जिकल स्ट्राईकसारखे हे ऑपरेशन वाटत असले तरी भारतीय लष्कराने याला सिलेक्टीव्ह टार्गेटींग म्हटले आहे. म्हणजेच मर्यादीत स्वरुपाची ही लष्करी कारवाई होती. इनफॅन्ट्री बटालियनचे पाच ते सहा घातक कमांडो पाकव्याप्त काश्मीरमध्ये 250 ते 300 मीटर आतपर्यंत घुसले. तिथे जाऊन या कमांडोंनी आईडी स्फोटके पेरून ठेवली होती. पाकिस्तानी लष्कराचे गस्तीवर असलेले 59 बलुच युनिट तिथे पोहोचताच त्यांना स्फोटाचा पहिला हादरा बसला. त्याचवेळी तिथे ब-याचवेळापासून प्रतिक्षा करत असलेल्या कमांडोंनी बेछूट गोळीबार सुरु केला. या कारवाईत आपले तीन सैनिक ठार झाल्याचे पाकिस्तानने मान्य केले असले तरी प्रत्यक्षात हा आकडा जास्त असल्याचे गुप्तचर सूत्रांनी सांगितले.
स्थानिक कमांडरने या ऑपरेशनची आखणी केली आणि ब्रिगेड कमांडरने मंजुरी दिली. त्यामुळे या कारवाईची सर्जिकल स्ट्राईकशी तुलना करता येणार नाही. सर्जिकल स्ट्राईक उच्चस्तरावर आखण्यात आलेली मोहिम होती. भारतीय लष्कराच्या पॅरा कमांडोंनी पीओकेमध्ये 2 किलोमीटरपर्यंत आतमध्ये घुसून पीर पंजाल भागातील चार दहशतवादी तळ आणि त्यांच्याजवळ असलेल्या दोन पाकिस्तानी चौक्या उद्धवस्त केल्या होत्या. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईकशी या ऑपरेशनची तुलना होऊ शकत नाही असे लष्करी अधिका-याने सांगितले.