प्रमुख धरणे आटली; देश पाणीटंचाईच्या सावटाखाली
By admin | Published: August 27, 2015 04:29 AM2015-08-27T04:29:36+5:302015-08-27T04:29:36+5:30
पुरेशा पावसाअभावी देशातील प्रमुख ९१ धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी खालावली असून गेल्या १० वर्षांतील सरासरीपेक्षाही कमी साठा या प्रकल्पांमध्ये असल्याचे केंद्रीय जल आयोगाने
नवी दिल्ली : पुरेशा पावसाअभावी देशातील प्रमुख ९१ धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी खालावली असून गेल्या १० वर्षांतील सरासरीपेक्षाही कमी साठा या प्रकल्पांमध्ये असल्याचे केंद्रीय जल आयोगाने नमूद केले आहे. त्यामुळे साहजिकच यंदा पाणीसंकट गहिरे होऊ शकते. पाणी टंचाईचे संकट दूर होण्यासाठी आगामी काळात चांगला पाऊस पडणे गरजेचे आहे.
देशातील प्रमुख धरण क्षेत्रात सध्या ९१ अब्ज घनमीटर पाणीसाठा असून तो वापरण्यायोग्य साठ्याच्या केवळ ५८ टक्के आहे. गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात १०३.५ अब्ज घनमीटर पाणीसाठा होता, तर गेल्या १० वर्षांतील सरासरी ९८.७ अब्ज घनमीटरपेक्षाही यंदा पाणीसाठा कमी आहे. त्यावरून पाणीटंचाईची तीव्रता लक्षात येऊ शकते.
उत्तर व मध्य भारत वगळता देशातील जलाशयांतील पाणीसाठा समाधानकारक नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. पश्चिम भारतातील २७ प्रकल्पांमध्ये (महाराष्ट्र व गुजरात) १५.८९ अब्ज घन मीटर (५९ टक्के) पाणी शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या ६१ टक्के साठ्याच्या तुलनेत यंदाचा साठा समाधानकारक आहे, असे म्हणता येईल.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
महाराष्ट्रात गंभीर स्थिती, धरणात ५ टक्केच साठा
राज्यातील १७ मोठ्या जलाशयांपैकी १३ प्रकल्पांत गेल्या वर्षीपेक्षा कमी साठा आहे. जायकवाडी, भीमा, येलदरी, गिरणा धरणांत तर केवळ ५ टक्केच उपयुक्त पाणी शिल्लक आहे.
पूर्व भाग अडचणीत
झारखंड, ओडिशा, प. बंगाल व त्रिपुरा या पूर्वेतील राज्यांतही दशकातील सरासरीपेक्षा कमी जलसाठा आहे. महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि कर्नाटकात जलशयांतील पाणी पातळी घसरली आहे.