पश्चिम नेपाळसह भारतातील 'या' शहरात भूकंप होण्याची शक्यता; शास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 08:05 PM2023-11-04T20:05:14+5:302023-11-04T20:10:02+5:30
भूकंपाचा केंद्रबिंदू काठमांडूच्या वायव्येस ५०० किमी अंतरावर असलेल्या जाजरकोट जिल्ह्यात होता.
नवी दिल्ली: भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री आलेल्या ६.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाने मोठी हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत १५४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो जखमी झाले आहेत. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, नेपाळमधील अनेक घरे जमीनदोस्त झाली. रुकुम पश्चिम आणि जाजरकोटमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला. पीडीएनएच्या अहवालानुसार, नेपाळ हा जगातील ११वा भूकंपग्रस्त देश आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री उशिरा नेपाळच्या सुदूर पश्चिम पर्वतीय भागात ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला तेव्हा हा पहिला भूकंप नव्हता.
भूकंपाचा केंद्रबिंदू काठमांडूच्या वायव्येस ५०० किमी अंतरावर असलेल्या जाजरकोट जिल्ह्यात होता. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राचे वरिष्ठ भूकंपशास्त्रज्ञ भरत कोईराला यांनी सांगितले की, पृथ्वीच्या आत सक्रिय युरेशियन प्लेट्समध्ये बराच काळ टक्कर होत आहे, ज्यामुळे प्रचंड ऊर्जा जमा झाली आहे. नेपाळ या २ प्लेट्सच्या सीमेवर वसलेले आहे आणि म्हणून ते अत्यंत सक्रिय भूकंपाच्या क्षेत्रात स्थित आहे, म्हणून नेपाळमध्ये भूकंप सामान्य आहेत.
भूकंपशास्त्रज्ञ कोईराला यांनी सांगितले की, पश्चिम नेपाळला भूकंपाचा सर्वाधिक धोका आहे. ते म्हणाले की, पश्चिम नेपाळमध्ये गेल्या ५२० वर्षांत एकही मोठा भूकंप झालेला नाही. त्यामुळे भरपूर ऊर्जा साठवली गेली आहे आणि ती ऊर्जा सोडण्याचा एकमेव मार्ग भूकंप आहे. कोईराला म्हणाले की, पश्चिम नेपाळमधील गोरखा (जिल्हा) ते भारताच्या डेहराडूनपर्यंत टेक्टोनिक हालचालींमुळे बरीच ऊर्जा जमा झाली आहे, त्यामुळे ही ऊर्जा सोडण्यासाठी या भागात छोटे-मोठे भूकंप होत आहेत, जे अत्यंत धोकादायक आहेत.
प्लेट दर १०० वर्षांनी पुढे सरकते
भूकंपशास्त्रज्ञांच्या मते, जगातील सर्वात नवीन पर्वतश्रेणी हिमालय आहे. तिबेट आणि भारतीय महाद्वीपीय प्लेट्सच्या टक्कर झाल्यामुळे त्याच्या दक्षिणेकडील टोकाला, युरेशियन प्लेट शतकानुशतके टेक्टोनिकदृष्ट्या वाढत आहे आणि विकसित होत आहे. भूकंपशास्त्रज्ञांनी सांगितले की या प्लेट्स दर १०० वर्षांनी २ मीटरने पुढे सरकत आहेत, परिणामी सक्रिय ऊर्जा अचानक पृथ्वीच्या आत सोडली जाते, ज्यामुळे पृथ्वीच्या वरच्या भागात हालचाल होते.
नेपाळमध्ये दररोज कमी तीव्रतेचे भूकंप-
भूकंप मॉनिटरिंग आणि रिसर्च सेंटरच्या डेटावरून असे दिसून येते की, १ जानेवारी २०२३ पासून नेपाळमध्ये ४.० आणि त्याहून अधिक तीव्रतेचे एकूण ७० भूकंप झाले आहेत. त्यापैकी १३ ची तीव्रता ५ ते ६ दरम्यान होती, तर तिघांची तीव्रता ६०० च्या वर होती. कोइराल म्हणाले की, टेक्टोनिक प्लेटच्या हालचालींद्वारे जमा झालेली ऊर्जा सोडण्यासाठी शतकानुशतके दररोज दोन किंवा अधिक तीव्रतेचे भूकंप होत आहेत.