रेल्वेच्या उत्पन्नात मोठी घट; खर्चाचा ताळमेळ जुळेना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 06:48 PM2019-12-02T18:48:38+5:302019-12-02T18:49:04+5:30
भारतीय रेल्वे जवळपास 30 हून अधिक क्षेत्रामध्ये काम करते.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. रेल्वेला 2017-18 मध्य़े 100 रुपये कमविण्यासाठी 98.44 रुपये खर्च करावे लागत आहेत. हा खुलासा कॅगच्या अहवालातून समोर आला आहे.
भारतीय रेल्वे जवळपास 30 हून अधिक क्षेत्रामध्ये काम करते. केंद्र सरकारने काही वर्षांपासून रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प मांडणे बंद केले आहे. कॅगच्या अहवालानुसार रेल्वेचा कामकाज खर्च 2017-18 मध्ये 98.44 टक्के होता. 2008-09 मध्ये 90.48 टक्के होता, 2009-10 मध्ये 95.28 टक्के, 2010-11 मध्ये 94.59 टक्के, 2011-12 मध्ये 94.85, 2012-13 मध्ये 90.19, 2013-14 मध्ये 93.6, 2014-15 मध्ये 91.25, 2015-16 मध्ये 90.49, 2016-17 मध्ये 96.5 टक्के एवढा खर्च होत होता. गेल्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद पाहता रेल्वेला दोन टक्केही उत्पन्न मिळत नसल्याचे समोर आले आहे.
मंदीच्या वातावरणामुळे यंदाही यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता कमीच आहे. कारण मालवाहतूक हा रेल्वेच्या उत्पन्नाचा खरा स्त्रोत आहे. मात्र, यंदा मंदीमुळे याचा फटका रेल्वेला बसला आहे. यामुळे कॅगने रेल्वेला अंतर्गत महसूल वाढीवर भर देण्याचे सुचविले आहे. तसेच खर्चही कमी करण्यास सांगितले आहे.