मुख्य सचिवांना मारहाण केल्याबद्दल केजरीवाल, सिसोदियांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 04:17 PM2018-08-13T16:17:13+5:302018-08-13T16:17:40+5:30
दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात आम आदमी पक्षाच्या 11 आमदारांचेही नाव आहे.
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना मारहाण केल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात आम आदमी पक्षाच्या 11 आमदारांचेही नाव आहे. यामुळे केजरीवाल यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. दिल्लीच्या नायब राज्यपालांविरोधातील खटला संपल्यावर आता नव्या खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.
हा आरोप सिद्ध झाल्यास यांना किमान एका वर्षाचा किंवा तीन वर्षांचा कारावास भोगावा लागू शकतो. सरकारी नोकरावरती कर्तव्य बजावताना हल्ला केल्याबद्दल आणि धमकी देऊन भीती दाखवल्याबद्दल प्रकाश जरवर आणि अमानतुल्ला खान या आमदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. दिल्लीच्या पतियाळा कोर्टात पोलिसांनी खटला दाखल केला आहे. 25 ऑगस्टरोजी या संदर्भात पुढील निर्णय घेण्यात येईल.
मुख्य सचिवांनी या प्रकरणी दिल्लीच्या नायब राज्यपालांची भेट घेऊन तक्रार केली होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयाने मुख्य सचिवांचे हे आरोप फेटाळून लावले होते. केजरीवालांच्या निवासस्थानी असे काहीही घडले नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले होते.