'या' राज्यात आपचा भाजपवर मोठा पलटवार, निवडणुकीच्या तोंडावरच 18 मोठे नेते फोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 20:47 IST2022-04-13T20:46:47+5:302022-04-13T20:47:21+5:30
दिल्लीचे आरोग्य मंत्री तथा हिमाचलचे निवडणूक प्रभारी सत्येंद्र जैन यांनी AAP मध्ये सामील झालेल्या या सर्व 18 नेत्यांचे पक्षाची टोपी घालून स्वागत केले.

'या' राज्यात आपचा भाजपवर मोठा पलटवार, निवडणुकीच्या तोंडावरच 18 मोठे नेते फोडले
हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच आम आदमी पक्षाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. येथील तब्बल 18 भाजप नेत्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री तथा हिमाचलचे निवडणूक प्रभारी सत्येंद्र जैन यांनी AAP मध्ये सामील झालेल्या या सर्व 18 नेत्यांचे पक्षाची टोपी घालून स्वागत केले.
यावेळी बोलताना सत्येंद्र जैन म्हणाले, हिमाचल प्रदेशातील हे सर्व नेते अरविंद केजरीवाल यांच्या विकासाच्या मॉडेलने प्रभावित होऊन पक्षात सामील झाले आहेत. हिमाचल प्रदेशात प्रचाराला सुरुवात करताच, विरोधी पक्षातील मेहनती लोक आपमध्ये सामील होत असल्यामुळे बरे वाटत आहे.
दोन कारणांमुळे भाजप सोडतायत नेते -
यावेळी, येणाऱ्या काही दिवसांत हिमाचलमधील जवळपास 1000 प्रभावशाली कार्यकर्ते आम आदमी पार्टीमध्ये सामील होतील, असा दावाही सत्येंद्र जैन यांनी केला. भाजप सोडून AAP मध्ये जाणाऱ्यांमध्ये हरमल धीमान यांचाही समावेश आहे. ते भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि एससी फ्रंटचे उपाध्यक्ष आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना जैन म्हणाले, अधिकांश लोक दोन कारणांमुळे 'आप'मध्ये येत आहेत. एक म्हणजे, हे लोक भाजपच्या राजकारण करण्याच्या पद्धतीमुळे वैतागले आहेत आणि दुसरे म्हणजे ते केजरीवालांच्या विकासाच्या राजकारणाने प्रेरित आहेत.
हिमाचलमध्ये भाजपची आपसोबत टक्कर -
आम आदमी पक्षाने नुकतेच पंजाबमध्ये प्रचंड बहुमत मिळवून सरकार स्थापन केले आहे. यामुळे त्यांचा उत्साहही वाढला आहे. आता आपने हिमाचल प्रदेशातही आपला संपूर्ण जोर लावला आहे. एवढेच नाही, तर भाजपचा सर्वात मजबूत बालेकिल्ला असलेल्या गुजरात निवडणुकीवरही पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे.